उल्हासनगर : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्यानिमित्त पावसात श्रीराम चौकातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने, महापालिकेवर टीका होत आहे. गणेशोत्सव दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र पाऊस सुरू झाल्याने काम बंद केले असून श्रीराम चौकातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत साळुंके यांनी दिली.
उल्हासनगरातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था झाली असून गणेशोत्सव दरम्यान रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम महापालिका बांधकाम विभागाने सुरू केले. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने, विभागाने रस्ते दुरुस्तीचे काम बंद केले. श्रीराम चौकातील रस्त्याच्या एका भागात खड्डेच खड्डे झाल्याने, त्या भागाचे डांबरीकरण सोमवारी केले. पाऊस थांबल्यावरच रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे संकेत यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश साळुंखे यांनी दिली. मात्र भर पावसात श्रीराम चौकात रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने, रस्त्याच्या दुरुस्ती बाबत नागरिकांनी प्रश्नचिन्हे उभे केले.
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी व दुरुस्तीसाठी ७ कोटीच्या निधीची तरतूद केली होती. दरम्यान रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे महापालिका बांधकाम विभागाने न भरल्याने पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था झाली. पाऊस थांबल्यास गणेशोत्सव पूर्वी रस्ते चकाचक करण्याचे आश्वासन आयुक्त अजीज शेख यांनी नागरिकांना दिले होते. मात्र पावसाने विश्रांती घेतली नसल्याने, रस्ता दुरुस्तीचे काम राहून गेले. मंगळवारी केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर शहरात येणार असल्याने, श्रीराम चौकातील रस्त्याचे पावसात डांबरीकरण झाल्याचा आरोप नागरिकांसह राजकीय पक्षनेते व दुकानदार करीत आहेत. मात्र यामध्ये तथ्य नसून हे काम नियमित असल्याची प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता साळुंके यांनी दिली