सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका बांधकाम विभागाने पावसाने विश्रांती घेताच गुरवार पासून रस्ते दुरस्तीला सुरवात केली. टर्निंग पॉईंट ते गोलमैदान रस्त्याच्या दुरुस्तीचे आमदार कुमार आयलानी यांनी पाहणी शुक्रवारी दुपारी करून फोटो सेक्शन करून घेतल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती व खड्डे भरण्यासाठी ६ कोटीच्या निधीची तरतूद केली होती. शहर पूर्व व पश्चिम असे दोन ठेके रस्ता दुरुस्तीचे दिले. मात्र पावसाला सुरवात झाल्यावर रस्ता दुरुस्ती व खड्डे भरण्याच्या कामाला ब्रेक लागला. बाप्पाचे आगमन व विसर्जनही खड्ड्याच्या रस्त्यातून झाले. दरम्यान पावसाने विश्रांती घेतल्याने, महापालिका बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. कॅम्प नं-३ परिसरातील पवई चौक, गोलमैदान, टर्निंग पॉईंट यासह अन्य रस्त्यातील खड्डे भरणे व डांबरीकरण करण्याचे काम सुरू केली. अशी माहिती बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी दिली. शुक्रवारी दुपारी कॅम्प नं-२ येथील टर्निंग पॉईंट ते गोलमैदान रस्त्याच्या डांबरीकरण व खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली.
आमदार कुमार आयलानी यांनी गोलमैदानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला शुक्रवारी दुपारी भेट दिली. तसेच दुरावस्था झालेल्या शहरातील रस्त्याची माहिती महापालिका बांधकाम विभागाच्या व अधिकाऱ्यांना देऊन रस्ता दुरुस्ती कामाची पाहणी केली. दरम्यान कुमार आयलानी यांनी रस्ता दुरुस्ती पाहणी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. आमदार आयलानी यांच्या याच फोटो सेक्शनची चर्चा सोशल मीडिया व शहरात रंगली आहे. आयलानी यांनीही आमदार निधी रस्ता दुरुस्तीसाठी देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.