उल्हासनगर : शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्याची पुनर्बांधणी करण्याऐवजी रस्त्यावर रस्ता बांधण्याचा घाट मराठा सेक्शन स्टेशन रस्त्यावर घातला जात आहे. जुना रस्ता मजबूत असल्याने व मुख्य रस्ता असल्याने रस्त्यावर रस्ता बांधण्यात येत असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.
उल्हासनगरात कोट्यवधीच्या निधीतून विविध रस्त्याचे काम सुरू आहे. कॅम्प नं-४ मराठा सेक्शन येथील स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम महापालिकेने सुरू केले. जुना रस्ता शाबूत चांगला असतांना, त्याच रस्त्यावर २ कोटीच्या निधीतून नव्याने रस्ता बांधण्यात येत आहे. रस्त्यावर रस्ता बांधण्यात येत असल्याने, नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. शहरातील बहुतांश दुरावस्था झालेली असतांना, त्या रस्त्याची पुनर्बांधणी अथवा दुरुस्ती करण्याऐवजी जुन्या चांगल्या अवस्थेत असलेल्या रस्त्यावर रस्ता बांधण्यात येत असल्याने, महापालिका कारभारावर सर्वस्तरातून टीकेची झोळ उठली आहे.
मराठा सेक्शन, जिजामाता गार्डन समोरील हा रस्ता उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता असून वाहनांची नेहमी वर्दळ असते. महापालिका शहर अभियंता संदिप जाधव व बांधकाम विभागाचे उपअभियंता तरुण सेवकांनी यांनी मराठा सेक्शन येथील स्टेशनकडे जाणारा हा रस्ता जुना असून मजबूत व चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे त्याला पुन्हा खोदून बांधण्या ऐवजी त्याच रस्त्यावर रस्ता बांधला जात असल्याची माहिती दिली. तसेच १५० कोटीच्या निधीतून एकून ७ मुख्य रस्त्याचे काम सुरू झाले असून मूलभूत सुखसुविधा योजने अंतर्गत इतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे. दिवाळी सणा दरम्यान बहुतांश रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरल्याचे जाधव म्हणाले. याव्यतिरिक्त अन्य रस्त्याच्या विकासासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याचे त्यांनी सांगितले.