- सदानंद नाईक उल्हासनगर : कोरोना अनलॉक मध्ये उद्याने व मैदाने नागरिकांसाठी खुली केल्याचा फायदा रोडरोमियो, नशेखोर व भुरटे चोरांनी घेतल्याचे चित्र आहे. त्यांच्या आंतकामुळे मुली, महिला व वृद्ध नागरिक मैदान व उद्यानात जाण्यास धजावत नसून नागरिकांनी अश्यावर वॉच ठेवून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर महापालिकेने नागरिकांच्या सुखसुविधा साठी मैदाने व उद्यानाच्या नुतनीकरण व दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. कोरोना महामारीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी उद्याने व मैदाने बंद ठेवली होती. मात्र कोरोनाचा संख्या कमी झाल्यावर, शासनाने अनलॉक सुरू करून मर्यादीत वेळे साठी मैदाने व उद्याने नागरिकांसाठी खुली केली. मात्र त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिक, मुली, महिलांना मिळत नसल्याचे चित्र आहे. गोलमैदान व येथील उद्यान खुनी म्हणून ओळखली जात असून त्याठिकाणी गेल्यावर्षी प्रेमप्रकरणातून महिलांचे खून झाल्याचे प्रकार उघड झाले. तीच परिस्थिती शहर पक्श्चिम मधील दसरा मैदान व इतर उद्यानाची आहे. गेल्याच आठवड्यात कॅम्प नं-५ येथील लाललोई गार्डन प्रवेशद्वार समोर पैशाच्या वादातून मित्रांनी मित्राचा खून केल्याचा प्रकार झाला. शहर पूर्वेतील व्हिटीसी मैदानाचे रुपडे बदलणार असून २० कोटीच्या निधीतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व स्टेडियम उभे राहणार आहे. मात्र सद्यस्थिती मैदानाची दुरावस्था झाली असून मैदानाच्या शौचालय परिसरात नशेखोर, भुरटे चोर, रोडरोमियांनी उच्छाद मांडला. मैदानाचे प्रत्येक कोपरे दारूच्या बॉटलेने भरून गेले. कॅम्प नं- ५ येथील लाललोई व नेताजी गार्डनचे कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्ती व नुतनीकरण करण्यात आले. मात्र येथेही रोडरोमियो, नशेखोर व भुरटे चोरांनी हैदोस घातला. नेताजी गार्डन मध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुली व महिलांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार होऊन सतर्क नागरिकांनी नशेखोरला चोप दिला. महिला व नागरिकांनी पोलीसांना फोन केल्यावर, सर्वशांत झाल्यावर पोलिस आल्याचा प्रकार झाला.
मैदाने व उद्यानाला सुरक्षारक्षकाची मागणी
महापालिकेच्या मैदाने व उद्यानाचा कब्जा काही दिवसांनी रोडरोमियो, नशेखोर व भुरटे चोर घेतात की काय? अशी परिस्थिती झाली. नागरिक, मुली, महिला, वृद्ध आदींच्या सुरक्षेसाठी विशिष्ठ जणांना मैदान व उद्यानात प्रवेश देणे. तसेच्या त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे.