ठाणे : एकाच जागी दहा महिन्यांत दुसऱ्यांदा रस्ता खचल्याची घटना गुरुवारी रात्री ठाण्यातील लोकमान्यनगर - डवलेनगर या परिसरात घडली. दक्ष नागरिकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी या मार्गावरील वाहतूक तातडीने थांबविल्याने मोठे अनर्थ टळले.
खचलेल्या रस्त्याला जवळपास सात ते आठ फूट खोल खड्डा पडला आहे. या रस्त्यावरील काँक्रिटीकरणाचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींसह स्थानिक नागरिक एकत्र आले आहेत, तर मनसेने हा रस्ता दोन विधानसभा मतदारसंघांच्या मधोमध असल्याने त्याचे काम केले जात नसल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेने या रस्त्याच्या कामाला वाहतूक शाखेकडून परवानगी मिळत नसल्याने दोन वर्षांपासून रखडल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम रात्रीपासून जेसीबी लावून हाती घेण्यात आले आहे.
लोकमान्यनगर टीएमटी डेपोकडे जाणारा रस्ता गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास खचल्याची बाब जेव्हा स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली, त्यावेळी तेथून टीएमटी डेपोत बस मार्गक्रमण करीत असल्याने तिच्यासह इतर वाहनांना वेळीच थांबविल्याने होणारे मोठे अनर्थ टळले. तातडीने याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. तसेच संबंधित विभागाने धाव घेत रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यास सांगितले. घटनास्थळी जेसीबी बोलवून काम सुरू केले. ज्या ठिकाणी खड्डा पडला होता, तेथे मलनिस्सारण पाईपलाईन टाकण्याचे काम केले आहे. ते झाल्यावर व्यवस्थित भरावा टाकण्यात न आल्याने तो खचला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी सकाळपासून त्या खड्ड्यासंदर्भात काम हाती घेतले आहे. दरम्यान, या रस्त्याखालील मातीचे परीक्षणदेखील केले जाणार आहे.
‘गेल्या गणपती विसर्जनाच्या दिवशी त्याच ठिकाणी पहिल्यांदा रस्ता खचून एक महिला जखमी झाली होती. त्यानंतर वारंवार पत्रव्यवहार करून रस्त्याचे काम हाती न घेतल्याने पुन्हा तो खचला. ही बाब विवेक घाडगे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तातडीने याबाबतची माहिती महापालिका प्रशासनाला दिली.
.....
या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.’
- राजेंद्र कांबळे- स्थानिक शाखाध्यक्ष मनसे
....
‘हा रस्ता साधारण रात्री १० वाजण्याच्या सुमारास खचल्याने तातडीने रात्री काम सुरू करण्यास सांगितले. ही जरी दुसरी घटना असली तरी या रस्त्याची वर्कऑर्डर दोन वर्षांपूर्वी काढलेली आहे. मात्र, वाहतूक शाखेकडून काम सुरू करण्यास परवानगी मिळत नसल्याने या रस्त्याच्या काँक्रिटीकरण करण्याचे काम थांबले आहे. हा विषय आता गंभीर होत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून पर्याय काढून तातडीने या रस्त्याचे काम करावे.’
- दिलीप बारटक्के, स्थानिक नगरसेवक, शिवसेना
.....
‘हा रस्ता जुना आहे, काँक्रीट रस्त्याचे काम करण्यासाठी वाहतूक विभागाकडून परवानगी मिळत नाही, त्यामुळे त्याचे काम थांबले आहे. मात्र, आता त्यावर तोडगा काढला जाणार आहे.’
-नरेश म्हस्के (महापौर- ठामपा)