ठाणे : ठाणे महापालिकेने जुन्या ठाण्यातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. सुरुवातीला २१ रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार होते. मात्र, आता त्यात भर पडली असून ३४ रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.जुन्या ठाण्यातील जवळपास ३० ते ४० वर्षे जुन्या इमारतींचा पुनर्विकास न झाल्यामुळे या इमारती मोडकळीस झाल्या आहेत किंवा धोकादायक यादीमध्ये गेल्या आहेत. त्या दाटीवाटीने उभ्या असल्याने अतिरिक्त एफएसआय किंवा टीडीआर मिळत नसल्याने त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. एमआरटीपी कायद्यानुसार ९ मीटरपेक्षा कमी रुंद असलेल्या रस्त्यांवरील बांधकामांना अतिरिक्त एफएसआय किंवा टीडीआर अनुज्ञेय नाही. नौपाडा, विष्णूनगर, राबोडी, खारटन लेन येथे तांत्रिक बाबींचा फटका बसत आहे. कोपरी ते माजिवडा पट्ट्यातील रोड हे ग्रामपंचायत काळात बांधले असून त्यांची रु ंदी ६ ते ८ मीटर असल्याने लोकसंख्येनुसार आणि वाहनांची संख्या पाहता ते अरुंद आहेत. एमआरटीपीनुसार इमारतीचा विकास करताना फायर ब्रिगेड किंवा आपत्ती विभागाचे वाहन आत येण्यासाठी ९ मीटर किंवा त्यापेक्षा अधिक रुंद रस्ता आवश्यक आहे.>सर्व्हेनंतर घेतला रस्ता रुंदीकरणाचा निर्णय : दरम्यान ठाणे महापालिकेने या सर्व रस्त्यांचा सर्व्हे केला होता. यामध्ये या सर्व २१ रस्त्यांची रु ंदी ९ मीटर पेक्षा कमी असल्याने वाहतूककोंडीचा मोठा सामना नागरिकांना करावा लागत असल्याची माहिती समोर आली होती. विशेष करून नौपाडा आणि राबोडी परिसरात अरुंद रस्त्यांची संख्या जास्त असल्याचे या सर्व्हेमधून समोर आले आहे. त्यामुळेच या रस्त्यांची रु ंदी वाढवण्याचा निर्णय होता. निवडणुकीच्या तोंडावर नेमक्या या प्रस्तावाला चालना देण्यात आली असून यामुळे जुन्या ठाण्याची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
ठामपाकडून रस्त्यांचे रुंदीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:41 AM