मीरा रोड : भार्इंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदान ते मोरवा आणि मोरवा ते उत्तनपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणादरम्यान स्थानिक भूमिपुत्रांच्या मूळ घराला हात न लावता रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यासोबत स्थानिकांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईकही या बैठकीला उपस्थित होते. तसेच ज्यांची जमीन बाधित होत आहे, त्यांना मोबदला वा हमीपत्र देऊ नच जमीन संपादित करावी, अशी सूचनाही करण्यात आली.
भार्इंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदान ते मोरवापर्यंत ३० मीटर रुंदीचा रस्ता एमएमआरडीएने बांधायला घेतला आहे. या रस्त्याच्या कामादरम्यान मुर्धा गावातील स्थानिकांची घरे जाणार आहेत. तर मुर्धा, राई, मोर्वा भागांत काही स्थानिकांच्या जमिनी आणि सरकारी जागेतील घरे जात आहेत. तर, मोरवापासून पुढे उत्तनपर्यंत २० मीटरचा रस्ता असून या रस्त्याच्या रुंदीकरणातही डोंगरी, आनंदनगर भागातील स्थानिकांची घरे आणि जमिनी जाणार आहेत.
या कामास अजून सुरुवात झाली नसली, तरी तो रस्ता मंजूर झाला असल्याचे सांगण्यात येते. या दोन्ही कामांना स्थानिकांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईकांची स्थानिकांनी भेट घेतली होती. त्यानुसार, सरनाईक यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या दालनात संबंधितांची बैठक बोलावली होती. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेवक हेलन गोविंद, राजू भोईर, धनेश पाटील, अर्चना कदम आदींसह सेनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आगरी-कोळी बांधवांच्या मूळ एकाही घराला हात लावू नका. ज्यांच्या जमिनी किंवा अंशत: बांधकामे येतील, त्यांचे योग्य तो मोबदला देऊ न पुनर्वसन करावे. स्थानिकांना आधी विश्वासात घ्या. वेळ पडल्यास रस्त्याची रु ंदी कमी करा, पण स्थानिकांच्या घरावर बुलडोझर चालवू देणार नाही, असा इशारा सरनाईक यांनी दिला. आयुक्तांनीही स्थानिकांच्या खाजगी वा सरकारी जागेतील घराला हात लावणार नाही तसेच ज्यांच्या जमिनी जातात, त्यांना मोबदला दिला जाईल, असे आश्वासन दिले. गावठाण भागात रस्ता कमी मिळत असेल, तर तसा प्रस्ताव करण्याचेही आयुक्तांनी मान्य केले.शिवसेना कायम भूमिपुत्रांसोबत : सरनाईकशिवसेना भूमिपुत्रांसोबत कायम आहे. त्यांच्यावर अन्याय सहन केला जाणार नाही. दुसरा कोणी आमदार असता तर त्याने ठेकेदाराशी साटेलोटे करून टक्केवारीसाठी स्थानिकांच्या घरांवर बुलडोझर फिरवला असता, असा टोलाही सरनाईक यांनी कोणाचे नाव न घेता लगावला. स्थानिकांनीही त्याला दुजोरा दिला. खासदार राजन विचारे, तसेच प्रताप सरनाईक आणि गीता जैन हे आमदार असल्याने अद्याप आमच्या घरांना हात लागलेला नाही. अन्यथा आमच्या घरांवर कधीच नांगर फिरवण्यात आला असता, अशी भावना स्थानिकांनी बोलून दाखवली.