नाशिक येथील आर.के. कन्स्ट्रक्शनला हा ठेका देण्यात आला आहे. या रस्त्याची लांबी ६.४५० किलोमीटर असून ११ मोऱ्या, ९०० मीटर काँक्रीटीकरण आणि ५.५५० किलोमीटर डांबरीकरणाचा समावेश आहे. यात ७५ मि.मी. खडीचा थर देऊन पाणीमिश्रित दबाई, एमपीएमचा थर ५० मि.मी. तसेच कारपेट, सिलकोट, २० मि.मी. यानुसार काम करायचे आहे. मात्र त्यानुसार काम केलेले नसल्यामुळे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ठिकठिकाणी मोऱ्या खोदून ठेवल्याने रस्ताही बंद होण्याच्या मार्गांवर आहे. यामुळे अजनुप, वारलीपाडा, कोळीपाडा, भाकरेपाडा, मेंगाळपाडा, कटीचापाडा, वारेपाडा, बोंडारपाडा, भस्मेपाडा, उठावा येथील आदिवासी ग्रामस्थांना माळरानातून वाट काढत रोज बाजारपेठ आणि पाडा गाठावा लागत आहे. तर रुग्णास डोली करून आणावे लागते.
दरम्यान, कामात दिरंगाई करणाऱ्या या ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाची कामे केली असून ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांचे संगनमत आणि स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींचे हाेणारे दुर्लक्ष कारणीभूत ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ठेकेदार दरवर्षी पावसाळ्याच्या ताेंडावर कामे सुरू करून कामाचे बिल काढण्याचा प्रयत्न करत असून त्यामुळे दहा आदिवासी पाड्यांना पक्क्या रस्त्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आराेपही त्यांनी केला.
बालमजुरांचा वापर
सध्या सुरू असलेल्या रस्ते कामात मजुरी वाचवण्यासाठी ठेकेदार बालमजुरांचा वापर करत आहेत. १० ते १४ वर्षे वयाची मुले रस्त्यावर खडी, डांबर टाकण्याची कामे करत आहेत. या ठेकेदारासह संबंधित खात्याचे अधिकारी, अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याप्रकरणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता उत्तम निकम यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.