उल्हासनगर : हिराघाट रस्त्याच्या आड येणारी झाडे न तोडता थेट कामाला सुरूवात केल्याने पालिकेचा अजब कारभार उघड झाला आहे. सतर्क नागरिकांनी याबाबत आवाज उठविल्यावर रस्त्याचे काम अर्धवट टाकून वृक्ष समितीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उल्हासनगर महापालिकेने काही महिन्यांपूर्वी २ कोटीच्या निधीतून हिराघाट ते गार्डन रस्त्याचे काम सुरू केले. नवीन शहर विकास आराखडयानुसार रस्ता पालिका गार्डनच्या एका बाजूला जात असून रस्त्याच्या आड १५ पेक्षा जास्त जुनी झाडे आहेत. रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी आड येणारी झाडे परवानगी घेऊन तोडायला हवी होती. मात्र तसे न करता महापालिकेने थेट रस्त्याचे काम सुरू केले. याबाबत पर्यावरणप्रेमींनी आवाज उठविला. अखेर महापालिकेने रस्त्याचे काम अर्धवट सोडून झाडे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीचा अभिप्राय व परवानगी मागितली. मागील महासभेत वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना झाली. आधी रस्ता मग झाडाच्या कत्तलीचा परवाना असा अजब प्रकार महापालिकेत उघड झाला आहे. येथील गार्डनची दुरवस्था झाली असून पूर्वी येथे नागरिक, मुले फिरायला येत होती. सध्या खाजगी गाडयांचे वाहनतळ झाले आहे. तसेच गार्डनवर अतिक्रमण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
झाडे न तोडताच रस्त्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:43 AM