प्रत्येक शहरात आज वाहनांची संख्या वाढल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तासन् तास या कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने वाहनचालकही त्रस्त होतात. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभाग प्रयत्न करत असला तरी त्यांना म्हणावे तसे यश येत नाही ही वस्तुस्थिती आहे. अनेक शहरांतून खासगी ट्रॅव्हलच्या बस मोठ्या संख्येने सुटतात. प्रवासीही या बसना प्राधान्य देत असल्याने त्या जिथून सुटतात तेथे नेहमीच कोंडी होते. ‘लोकमत’ने काही शहरांचा आढावा घेऊन नेमकी कोंडीची कारणे काय आहेत हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न.
ठाण्यातील तीनहातनाक्याला पडतो बसचा विळखा
- जितेंद्र कालेकर ठाणे : ठाणे शहरातून परराज्यासह राज्यभरात मोठ्या प्रमाणात एक हजारांपेक्षा जास्त प्रवासी खासगी बसने प्रवास करतात. या बसमुळे तीनहातनाका येथे अनेकदा वाहतूककोंडी होते. ती होऊ नये म्हणून खासगी बससाठी स्वतंत्र वाहनतळ किंवा डेपोसारखी जागा देण्याची मागणी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने महापालिकेकडे केली आहे.तीनहातनाका येथून सायंकाळी ७ ते रात्री ११.३० पर्यंत अनेक खासगी बस कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आणि हैदराबाद आदी राज्यांमध्ये जाण्यासाठी सुटतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शिर्डी, अमरावती, जालना, अहमदनगर, सांगली, चिपळूण, सोलापूर, नाशिक, पुणे, अकोला, औरंगाबाद, यवतमाळ, धुळे, लातूर, सातारा, बीड, वाशिम, शिरपूर, महाबळेश्वर आदी जिल्हे तसेच मोठ्या शहरांमध्ये जातात. बहुतांश बस या मुंबईतून सुटून ठाण्यातून प्रवासी घेतात. या ठिकाणी मोठा पिकअप पॉइंट असल्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी असते. काहींचे या ठिकाणी अधिकृत ट्रॅव्हल्स सेंटर आहेत. काहींनी छोट्या गाळ्यांमध्ये हा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे सायंकाळी ७ नंतर या ठिकाणी बस येण्यास सुरुवात होते. पेट्रोल पंपापासून ते तीनहातनाक्याचा पिकअप पॉइंट या ठिकाणी बसच्या रांगा लागतात. या मार्गावर एमएमआरडीएकडून मेट्रोचेही काम सुरू आहे. त्यामुळे तीनहातनाका ते नितीन कंपनीकडे जाणारा सेवा रस्ता या बसचा वाहनतळ झाला आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठी कोंडी होत असल्याचेही चित्र पाहायला मिळते. ती होऊ नये म्हणून तीनहातनाका येथील हे वाहनतळ आता अन्यत्र हलविण्यात यावे, अशी प्रवाशांचीही मागणी आहे. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेनेही त्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांकडे यासाठी वाहनतळाची मागणी केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये इटर्निटी मॉल ते ज्ञानसाधना महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही खासगी बसचा पिकअप पॉइंट लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुरू करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
१,५०० प्रवासी करतात दररोज प्रवास ठाण्यातून किमान ७० ते ९० बस या परराज्यात तसेच राज्यांतर्गत जिल्ह्यात दररोज तीनहातनाका येथून सुटतात. यातून दीड हजार प्रवासी रोज प्रवास करतात. सिझननुसार यात बदल होत असतो. तसेच शनिवार, रविवारला लागून सुट्या आल्यास प्रवाशांची गर्दी वाढते. खासगी बससाठी स्वतंत्र वाहनतळ आणि पिकअप पॉइंट असल्यास प्रवाशांनाही सोयीचे होणार आहे. शिवाय, वाहतूककोंडीही होणार नाही.- स्वप्निल राऊत, प्रवासी, ठाणेतीनहातनाका येथे होणारी कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली आहे. खासगी बससाठी स्वतंत्र वाहनतळाच्या जागेसाठी मागणी केली आहे. पालिकेने यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर राष्ट्रीय महामार्गावरच ट्रॅव्हलच्या बसचे थांबे- धीरज परबमीरा रोड : मीरा-भाईंदरमधून देशातील विविध राज्यांतच नव्हे तर थेट नेपाळपर्यंत बस सुटतात. परंतु या बस सुटण्याचे थांबे मुख्य रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गावरच असल्याने या बसमुळे वाहतूककोंडी नेहमीचीच झाली आहे. परंतु प्रवाशांना भुर्दंड पडला तरी चालेल, पण संबंधितांचे खिसे सांभाळून बस चालवत असतात .मीरा-भाईंदर शहर हे मुळात संमिश्र लोकवस्तीचे असल्याने देशातील बहुतांश राज्यांतील नागरिक येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी गाड्या किंवा बस हे दोन मुख्य पर्याय आहेत. सध्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या कमी असल्याने हे प्रवासी खासगी बसने जात असल्याने बस प्रवाशांची संख्या वाढली आहे.गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार ते थेट नेपाळपर्यंत जाणाऱ्या बहुतांश बस या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशिमीरा नाका, वेस्टर्न हॉटेलच्या पुढे तसेच वरसावे नाका आदी ठिकाणी थांबत जातात. काही बस शहरातून तर काही बोरीवली भागातून निघतात. या राज्यांमध्ये जाणाऱ्या बसची संख्याही मोठी असून रोज सुमारे १०० च्या आसपास बस जातात.कर्नाटकातील प्रमुख शहरांसाठी मुख्यत्वे मीरा रोडच्या शीतलनगर भागातून बस सुटतात. या बस मुख्य रस्त्यांवर थांबत प्रवाशांना घेत पुढे जातात. सध्या रोज सुमारे २५-३० बस कर्नाटकासाठी जातात. याशिवाय आंध्र प्रदेश येथेही बस जातात, पण त्यांची संख्या तुरळक आहे. बहुतांश खासगी बस शहरातील मुख्य रस्त्यांवरच पार्किंगसाठी उभ्या केल्या जातात. शिवाय बस वर्दळीच्या भागातून सुटतात आणि मुख्य रस्त्यांवर थांबे आहेत. मुळात या थांब्यांना कायदेशीर परवानगी नसते. प्रवासी व त्यांच्या सामानासाठी बस जास्त वेळ रस्त्यावर थांबत असल्याने कोंडी त्रासदायक होते.खासगी बसचा व्यवसाय मोठा फायद्याचा असला तरी त्यातील वाटेकरीही कमी नाहीत. कारण अनेकांना सांभाळत बस चालवायच्या असतात. त्याचा भुर्दंडही प्रवाशांच्या खिशावरच टाकला जातो. यातून पालिका आणि सरकारला मात्र फारसा काही फायदा होत नसतो. त्यामुळे खासगी बसना पालिकेने अधिकृत बसस्थानक सशुल्क उपलब्ध करून दिल्यास शहरात कुठेही बस उभ्या करून प्रवाशांना घेण्यासाठी होणारी वाहतूककोंडी टळेल. खासगी बसच्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी सुविधायुक्त बसस्थानक महापालिकेने उपलब्ध करून दिले पाहिजे. जेणेकरून रस्त्यांवर बस थांबणार नाहीत आणि वाहतूककोंडी होणार नाही. - कृपाशंकर दवे, प्रवासी उल्हासनगरात दिलासा- सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील १७ सेक्शन येथून राज्यासह गुजरात, गोवा, केरळ, कर्नाटक आदी अन्य राज्यांत जाण्यासाठी ट्रॅव्हलच्या बस सुटतात. मात्र, बहुतांश बस रात्री १० नंतर सुटत असल्याने, वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत नसल्याची प्रतिक्रिया वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी दिली.कॅम्प नं-१७ सेक्शनमध्ये सात ते आठ ट्रॅव्हल एजन्सी असून, येथून बस शिर्डीसह इतर देवस्थानासाठी सुटतात. तसेच नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नाशिक यांच्यासह संपूर्ण राज्यात बस जातात. गोवा, गुजरातमधील सूरत, बडोदा, अहमदाबाद, बेळगाव आदी ठिकाणी बस रवाना होतात. बहुतांश बस रात्री १० नंतर सुटत असल्याने, कोंडीची समस्या निर्माण होत नसल्याचा दावा ट्रॅव्हल एजन्सी चालकांनी केला आहे. वाहतूककोंडीची समस्या जेव्हा जेव्हा निर्माण झाली, तेव्हा ट्रॅव्हल बस व एजन्सी चालकांवर कारवाई केल्याची माहिती धरणे यांनी दिली. नेताजी चौक परिसर, शांतीनगर, विठ्ठलवाडी आदी ठिकाणी बस उभ्या केल्या जातात. एजन्सीचालक प्रवाशांना बस सुटण्याच्या १० मिनिटांपूर्वी बोलवतात, दुर्गाडी किल्ला व इतर ठिकाणांवरून बस जात असल्याने, तेथे प्रवाशांना पाठविले जात असल्याची माहिती एजन्सी चालकांनी दिली. ‘त्या’ बसच्या पार्किंगमुळे चौकांना कोंडीचे ग्रहण!- प्रशांत मानेडोंबिवली : बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीच्या बस प्रवासी घेण्यासाठी व सोडण्यासाठी शहरातील मुख्य चौकांमध्ये उभ्या राहत असल्याने, चौकांना संध्याकाळी कोंडीचा सामना करावा लागत आहे. हे चित्र कल्याण-डोंबिवलीत सदैव दिसते. चौकाचौकात ट्रॅव्हल बसबरोबर प्रवाशांची होणारी गर्दी पाहता याचा फटका वाहतुकीला बसतो. त्यामुळे या बस अन्यत्र ठिकाणी उभ्या कराव्यात, अशी मागणी अन्य वाहनचालकांकडून होत आहे.घरडा सर्कल हा शहरातील मुख्य ठिकाणांपैकी एक आहे. हा मार्ग पुढे कल्याण-शीळ मार्ग, एमआयडीसी, कल्याणला जोडला जात असल्याने, तेथे नेहमी वाहनांची वर्दळ असते. त्यात संध्याकाळी बाहेरगावी जाणाऱ्या बस या सर्कलच्या भोवताली उभ्या केल्या जातात. यात काही प्रमाणात रस्ता व्यापला जातो. त्यात या बसमधून जाणाऱ्या प्रवाशांचीही त्या ठिकाणी गर्दी होते. त्यातच बस मागे-पुढे करताना कोंडीत अधिकच भर पडते. या ठिकाणाहून बेळगाव, शिर्डी, जळगाव-भुसावळ, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदाबाद, मेंगलोर या बस रात्री साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान सुटतात. त्याच वेळी कंपनीच्या बसही तेथे कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी येतात. या आधी शहरातील सर्वेश सभागृह, कस्तुरी प्लाझा आणि नेहरू मैदानाजवळ ट्रॅव्हलच्या बस उभ्या राहत होत्या, परंतु शहरात रहदारीच्या ठिकाणी येणाऱ्या या बसमुळे होणारी कोंडी पाहता, शहराबाहेर गाड्या उभ्या करण्यास आरटीओने सूचना केल्याचे ट्रॅव्हल्स एजंट यांचे म्हणणे आहे.कल्याणमध्येही चौकांना विळखाकल्याणचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. पश्चिमेतील लालचौकी, सहजानंद चौक, संतोषी माता रोड, काळा तलाव रोड, बिर्ला कॉलेज-दुर्गाडी चौक, मुरबाड रोडवरील प्रेम ऑटो चौकांमध्ये ट्रॅव्हल्सच्या बस प्रवाशांना घेण्यासाठी उभ्या असतात. गुजरात, उत्तर प्रदेश या लांब पल्ल्याच्या ठिकाणांसह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी येथून बस सुटतात. अवाढव्य आकाराच्या बस या प्रवाशांना घेण्यासाठी चौकांमध्ये जाताना शहरातून मुख्य रहदारीच्या मार्गावरून जातात, त्यावेळीही कोंडी होते.