मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेस सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ विकसित केलेले रस्ते हे लहानमोठ्या वाहनांना फुकटात आंदण दिले आहेत. या भागातील रस्त्यांवर सर्रास बस, डम्पर, कचरागाड्या, रिक्षांच्या बेकायदा पार्किंगचे अतिक्रमण झाले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
बोस मैदानासमोरील एक मुख्य रस्ता भार्इंदर स्थानक ते उत्तन असा जातो. तर, एक ४५ मीटर रुंद रस्ता असून मैदानासमोरून तो उत्तन, भार्इंदर उड्डाणपूल असा जातो. हे दोन्ही रस्ते महत्त्वाचे आणि वर्दळीचे आहेत. या मार्गांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी तर वाहनांची संख्या अधिक असते.
बोस मैदानासमोरील रस्ता रुंदीकरणासाठी येथील झोपड्या हटवून पात्र बाधितांना पक्की घरे पालिकेने दिली. परंतु, रुंदीकरण होऊनही या ठिकाणी पदपथावर झोपडीधारकांनी अतिक्रमण केले आहे. तर, रस्त्याच्या दोन्ही बाजूलाच नव्हे तर रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला लागूनही सर्रास बेकायदा वाहने उभी केली जातात. गॅरेज आदी व्यवसाय थाटले आहेत. मैदानाजवळील रस्त्यावर बस, ट्रक यांच्या रांगा लागलेल्या असतात. अगदी निम्मा रस्ताच या मोठ्या वाहनांनी व्यापलेला असतो. यामुळे नेहमीच अपघाताची भीती असते.भार्इंदरकडून मुर्धा-उत्तनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला तर थेट कांदळवनात भराव करून भूखंड तयार केले असून त्या ठिकाणी सर्रास पालिका कंत्राटदाराच्या कचºयाच्या गाड्या, रिक्षा, बस, टेम्पो आदी वाहनांचे अतिक्रमण झालेले आहे. येथेही गॅरेजचे काम केले जाते. पालिकेने पाच लाख खर्चून बांधलेले स्टीलचे बसथांबेही या कचºयाच्या गाड्यांनी धडक मारून तोडले आहेत. पालिकेने येथे तारेचे कुंपण घातले होते, तेही पाडून टाकले आहे. यात पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असताना बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच नगरसेवक गप्प आहेत. अजूनपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही.
या भागात सर्रास होणाºया व्यावसायिक वाहनांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगमुळे नागरिक त्रासलेले असताना त्यांना पाठीशी घालण्याचे काम नगरसेवक, पोलीस प्रशासन करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.