सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागात असलेल्या छोट्या साध्या रस्त्यांना ठाणे जिल्हा परिषदेने व्हिलेज रोड (व्हीआर) असा दर्जा देऊन त्यांच्या दुुरुस्तीसाठी खर्च करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये सर्व तालुक्यांमधील १३६ रस्त्यांचा समावेश आहे. यामुळे गावखेड्यांचे रस्ते चांगले होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील गावखेड्यांमध्ये असलेले रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. त्यांच्या दुरुस्तीची समस्या उद्भवत असल्यामुळे गावकऱ्यांना या खराब रस्त्यावरूनच येजा करावी लागत असे. यांच्या दुरुस्तीसाठी निधी प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रथम या १३६ रस्त्यांची जिल्हा परिषदेने दर्जोन्नती करून त्यांना व्हीआर दर्जा दिला आहे. यामुळे या कामांसाठी जिल्हा परिषदेला व पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनादेखील निधी मंजूर करून त्यावर खर्च करणे शक्य होणार आहे. या ठरावास जिल्हा परिषदेने एकमुखी मंजुरी दिली आहे.भिवंडी तालुक्याला सर्वाधिक लाभ : ५७ रस्त्यांचे रुपडे पालटणारग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील या १३६ रस्त्यांचे आता भाग्य उजळले आहे. त्यांचे दर्जेदार काम करण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी ठेकेदारांकडून उत्तम दर्जाचे काम करून घेण्याची गरज सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. यामध्ये भिवंडी तालुक्यातील ५७ रस्त्यांचा समावेश आहे. यात कोन ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील रस्त्यांसह सरवली, पिंपळनेर, गोकानाका, निंबवली, येवई, वडपे, काशिवली, घोटघर, गणेशपुरी, भेंडीचा पाडा, मालबीडी, मोहिली, आकलोली आदी गावांच्या परिसरातील ५७ रस्त्यांना व्हीआर दर्जा मिळाला आहे. याप्रमाणेच शहापूर तालुक्यामधील चिल्हरवाडी, जांभळवाड, आसनगाव, शेई, मासवणे, टेंभरे, नेहरोली, दहिवली, नांदवळ, किन्हवली, शीळ, दलालपाडा आदी २१ गावांच्या रस्त्यांचा समावेश या दर्जामध्ये केला आहे.मुरबाडचे २८ तर अंबरनाथचे १० रस्ते : या व्हीआर दर्जामध्ये मुरबाड तालुक्यामधील कळंबे, करणे, कुंभेपाडा, दहीपाडा, पारतेळ, रातांदळेपाडा, बिरवाडी, लाहे, करपटवाडी, टेंभुर्ली, करवेळे, वाघिवलीपाडा, ब्राह्मणपाडा, टेंबर, धानिवली, साकुर्ली, गुंडे आदी २८ रस्त्यांचा समावेश आहे. कल्याण तालुक्यातील भिसोळपाडा, वाघेरापाडा आदी तीन रस्त्यांचा तर अंबरनाथ तालुक्यातील पाटीलपाडा, आघानवाडी, वडाचीवाडी, चामटोली, ढवळे, वांगणी, ढोके, खारीकपाडा, डोणेगाव, दपिवली, भिनारपाडा, सागाव, बारवी नदी आदी १० रस्त्यांना व्हीआर दर्जा मिळाला आहे.