नितीन पंडित
भिवंडी - भिवंडीत सोमवार व मंगळवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अवकाळी पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे भिवंडी महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे नागरिकांना वाट काढताना मोठी अडचण झाली असून विद्यार्थी व वृद्ध नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर साफसफाई करून भिवंडी महापालिका स्वच्छ भारत अभियानाचा नेहमीच गाजावाजा करत असते, मात्र शहरातील अंतर्गत व मुस्लिम बहुल परिसरात स्वच्छते बाबत मनपा प्रशासन नेहमीच उदासीन असते. सोमवार व मंगळवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे मनपाचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर आला असून अनेक अंतर्गत रस्त्यांवर चिखलाचे व घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
एकीकडे राज्यात कोरोना संकटाने पुन्हा डोके वर काढले असून भिवंडी महापालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरविणीवर आला आहे.मागील अनेक महिन्यांपासून भिवंडी महापालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने लोकप्रतिनिधींचा आप आपल्या वार्डातील समस्यांकडे दुर्लक्ष झाले असून प्रशासक असलेले मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांचा देखील शहर विकास व शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याची बाब अवकाळी पडलेल्या पावसामुळे समोर आली असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.