मीरारोड - मीरा भाईंदर मधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून गणरायाचे आगमन देखील भाविकांना खड्डेमय रस्त्यांवरून करावे लागले . शहरातील मुख्य रस्त्यां पासून गल्लीबोळातील रस्ते देखील खड्ड्यात गेले असून गेल्या वर्षी खड्डयां मुळे बळी जाऊन देखील महापालिका आणि नगरसेवक यांचे दुर्लक्ष कायम आहे .
या वर्षी देखील पावसाळा सुरु होताच शहरातील बहुतांश लहान - मोठे रस्ते खड्ड्यात गेले आहेत . त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असुन वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहेत . दुचाकी स्वरांना तर खड्डे चुकवत वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे . पालिकेने काही ठिकाणी खड्ड्यात भरलेली खडी सुद्धा निघाली असून ती रस्त्यावर पसरल्याने आजूबाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांना वाहनाच्या चाकाखाली दगड उडून मार बसण्याची भीती वाटते .
खड्डयांमुळे काही चालक व प्रवाश्याना पाठ , कंबर दुखीचा त्रास देखील होत असल्याच्या तक्रारी आहेत . मुळात पालिका रस्ता बनवताना तो निकृष्ट बनवते आणि त्याचा समतोस साधला जात नाही म्हणून रस्त्यात पाणी साचुन दरवर्षी रस्ते खराब होतात . मग त्याच रस्त्यांच्या पॅचवर्क साठी कोट्यवधी रुपयांचे ठेके दिले जातात .
गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये काशिगावा जवळ छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील एका खड्डय़ा मुळे बोरीवलीच्या दत्तापाडा मार्गावर राहणारे हेमंत कांबळे (33) यांचा मृत्यु झाला होता. खड्डय़ा मुळे एकटीव्हा वरुन खाली पडलेल्या कांबळे यांच्या अंगावर मागुन आलेला गॅस सिंलेंडरचा ट्रक चढला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेने महापालिकेवर संतापाची झोड उठली होती . यंदा देखील खड्डयां मुळे आणखी कोणाचा बळी जाण्याची वाट पालिका पहात आहे का ? असा संताप लोकं व्यक्त करत आहेत .