सदानंद नाईक, उल्हासनगर: गेल्या दोन दिवसांच्या पावसाने भुयारी गटार योजनेच्या कामाची माती रस्त्यावर येऊन रस्ते चिखलमय झाले. या चिखलमय रस्त्यामुळे लहान मोठे अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत असून भुयारी गटारीचे काम पूर्ण होताच, खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगरात अनेक ठिकाणी भुयारी गटारीच्या कामाला सुरवात झाली असून रस्ता खोदून मलनिस्सारणसाठी पाईप टाकण्यात येत आहेत. मलनिस्सारणसाठी पाईप टाकल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करणे ठेकेदाराला बंधनकारक असतांनाही, कुठेही रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे खोदलेल्या रस्त्याची माती रस्त्यावर येऊन पावसाने रस्ते चिखलमय झाले. यातून लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मलनिस्सारण साठी टाकण्यात येत असलेले पाईप आदींच्या पाईप पेक्षा आकाराने लहान असल्याचा आक्षेप अनेकांनी घेऊनही महापालिका बघायची भूमिका घेत आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री यांनी केला आहे. असेच काम सुरू राहिल्यास, भविष्यात भुयारी गटारीचा मोठा प्रश्न उभा ठाकनार असल्याची भीती गंगोत्रीसह बीएसपीचे प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे यांनी व्यक्त केली.
शहरात काही वर्षांपूर्वी ४०० कोटीची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही पाणी टंचाई जैसे थे आहे. पाणी समस्या सोडवण्यासाठी पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शासनाने पुन्हा १२८ कोटीच्या निधीला मंजुरी दिली. पाणी पुरवठा वितरण योजने प्रमाणे भुयारी गटार योजना फसण्याची भीती सुरवातीपासून व्यक्त होत आहे. भुयारी गटारीच्या पहिल्या टप्प्यात मुख्य मलनिस्सारण पाईप नव्याने टाकले असून दुसऱ्या टप्प्यात मलनिस्सारण केंद्र उभारले आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील ४२३ कोटीच्या निधीतून शहर अंतर्गत मलनिस्सारण पाईप टाकण्यात येत आहे. नव्याने टाकण्यात येत असलेले भुयारी गटारीचे पाईप जुन्या पाईप पेक्षा लहान असल्याने, त्यामध्ये सांडपाणी वाहून नेण्याची क्षमता आहे का? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.
या रस्त्यावर झाला चिखल
शहरातील शांतीनगर ते डॉल्फिन रस्ता, कुर्ला कॅम्प रस्ता, हिंदू स्मशानभूमी, जुनी महाराष्ट्र बँक ते दत्तात्रय व्यायाम शाळा रस्ता आदी रस्ते खोदून भुयारी गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने, पावसाने रस्ते चिखलमय झाले आहे.