ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी आणि नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाला आहे. त्यानुसार शहरातील नौपाडा, खोपट, कळवा आणि मुंब्रा या परिसरातील सहा अंतर्गत रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी तीन कोटी २३ लाख ५८ हजारांचा खर्च केला जाणार आहे.
गेल्या काही वर्षात महापालिकेने शहरातील कॅडबरी, स्टेशन परिसर, पोखरण रोड १,२, आणि ३, शास्त्री नगर ते हत्तीपूल आदींसह इतर भागातील रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. त्यामुळे या भागाची वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. त्यानंतर आता शहरातील खराब आणि खड्डेमय झालेल्या रस्त्यांच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेने यातील काही रस्ते विविध कामांसाठी खोदले होते. त्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडतात आणि यातून नागरिकांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे दुरवस्था झालेल्या अंतर्गत रस्त्यांकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने त्यांची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नौपाड्यातील सेवा रस्त्याकडून शांतीनगरकडे जाणारा रस्ता तसेच ठाणे पूर्व स्थानकातील गावदेवी रस्ता, खोपट येथील सत्संग इमारतीकडे जाणारा रस्ता, मुंब्य्रातील ख्वाजा फखर पॅलेस ते पाकिजा कॉलनी नाका, कळव्यातील साईधाम अपार्टमेंट ते मेघडंबरी रस्ता, दुर्गानगर आणि गणोशनगर अंतर्गत रस्ता अशा सहा रस्त्यांचे काँक्रिटीकरण व युटीडब्ल्युटी पद्धतीने नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामाच्या निविदेस स्थायी समितीने मान्यता दिली आहे.