उल्हासनगर : शहरातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था होऊन खड्डेमय झाल्याने, नागरिक, वाहनचालक हैराण झाले. तसेच लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पाऊस थांबताच रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू करणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी देऊन १७ कोटोच्या निधीची तरतूद केल्याचाही माहिती दिली.
उल्हासनगरातील रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे पावसाळ्या पूर्वी भरण्याला महापालिकेने मंजुरी देऊन साडे सहा कोटीच्या निधीची तरतूद केली. मात्र तांत्रिक कारण व पावसाळयाला सुरवात झाल्याने, रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम राहून गेले. परिणामी संततधार पावसाने रस्त्याची दुरावस्था झाली. रस्ते खड्डेमय झाल्याने, वाहन चालक व नागरिक हैराण झाले. दरम्यान लहान दगड, रेती, दगडाचा चुरा आदीने तात्पुरते खड्डे भरण्याचे काम पालिकेने सुरू केल्यानंतरही नागरिकांसह राजकीय नेत्यांनी रस्त्यातील खड्याचा प्रश्न लावून धरला. मनसेने तर खड्डे प्रदर्शन भरून सर्वाधिक चांगल्या खड्डयाचें फोटो पाठवून नागरिकांनी पाहिले पाच बक्षिसे मिळावा. असे आवाहन केले. तर मनसे वाहतूक शाखेने कानशिलात मारण्याची तंबी दिली.
महापालिकेतील ७० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे असतानाही रस्त्याची दुरावस्था झाल्याने, रस्त्याच्या दर्जा बाबतची चर्चा शहरात रंगली. डांबरीकरणासह सिमेंट रस्त्याची चाळण झाल्याने, महापालिकेच्या कारभारावर सर्वास्थरातून टीका होत आहे. तर पाऊस थांबताच रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. रस्त्यातील खड्डे व दुरावस्था बघता १० कोटीच्या वाढीव निधीला मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी साडे सहा कोटी व पुन्हा १० कोटी असे एकून साडे १६ कोटीच्या निधीतून रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम करण्यात येणार आहे. शुक्रवारी शिवाजी चौक परिसरात एक वृद्ध खड्डयात पडून गंभीर जखमी झाल्याचेही बोलले जाते. एकूणच पाऊस थांबताच रस्ते चकाचक दिसणार असल्याची माहिती उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली.