ठाणे : कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशाला लुटल्याची घटना घडली. चॉकलेटमध्ये गुंगीचे औषध देऊन त्याच्याकडील रोख पाच हजार आणि मोबाईल लांबवण्यात आला. बेशुद्धावस्थेत असल्याने त्याला मंगळवारी सकाळी ठाण्याच्या जिल्हा सिव्हील रुग्णालयात दाखल केले. एकीकडे रेल्वे प्रवासात कोणी खाद्यपदार्थ दिले तर घेऊ नये, असे आवाहन केले जात असताना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबईकर असलेला तारीक सिद्दीकी (२८) हा काही कामानिमित्त मडगांव येथे गेला होता. तेथून सोमवारी रात्री मुंबईकडे येण्यासाठी कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये बसला होता. प्रवासादरम्यान त्याला कोणीतरी चॉकलेट दिले. ते खाल्ल्यानंतर तो बेशुद्ध झाला. तो बेशुद्ध झाल्याचे त्या डब्यातील प्रवाशांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी याबाबत रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या हेल्पलाईनवर माहिती दिली. तेव्हा ही एक्स्प्रेस सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचत होती. त्यानुसार ठाणे रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी धाव घेऊन त्याला तातडीने रेल्वे स्थानकावरील क्लिनिकमध्ये प्रथमोपचारासाठी नेले. त्यानंतर त्याला ठाणे जिल्हा सिव्हील रूग्णालयात दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याला गुंगीचे औषध दिल्याने तो बेशुद्ध झाल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. तो शुद्धीवर आल्यावर ते त्याला घरी घेऊन गेले. कुणीतरी चॉकलेटमध्ये गुंगीचे औषध देऊन त्याच्याकडील रोख पाच हजार आणि मोबाइल फोन लांबवल्याची बाब पुढे आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.गुन्हा रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करणाररत्नागिरी रेल्वेस्थानकादरम्यान तारीक याला चॉकलेट दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करून रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती ठाणे आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी दिली.