---------------
घरफोडीमध्ये चांदीचे भांडे चोरीला
कल्याण : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. पश्चिमेतील संतोषीमाता रोडवरील जलारामनगर सोसायटीत राहणारे उमेश गुप्ते यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील २६ हजार ४०० रुपये किमतीचे चांदीचे भांडे चोरून नेले. ही घटना ९ ते १६ ऑगस्टदरम्यान घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------
रिक्षा उलटल्याने दाम्पत्य जखमी
कल्याण : पूर्वेतील पुणे लिंक रोडवरून रिक्षाने प्रवास करताना रिक्षाचालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने रिक्षाचे हॅण्डल एका बाजूला जोरात ओढल्याने भरधाव रिक्षा उलटली. त्यात रिक्षेतील प्रवासी अभिषेक गभाले आणि त्यांची पत्नी मयूरी हे जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५.३० ला घडली. याप्रकरणी अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षाचालक आणि त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती, अशा दोघांवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
---------------------------------------
दुचाकीची चोरी
डोंबिवली : निखिल भगत यांनी त्यांची दुचाकी ते राहत असलेल्या पश्चिमेतील सत्यवान चौकातील धर्मा स्मृती बिल्डिंगच्या आवारात पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
--------------------------------------
कोरोनाचे ६३ रुग्ण
कल्याण : केडीएमसी हद्दीत गुरुवारी कोरोनाचे नवीन ६३ रुग्ण आढळून आले. तर, उपचाराअंती ३२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ४८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मनपा हद्दीत एक लाख ३७ हजार ५५ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
------------------------------------------
कुत्र्याच्या पिलाला मारहाण
कल्याण : कुत्र्याच्या पिलाला मारहाण करून त्याला कुठेतरी सोडल्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी सुखराम आटवल यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पश्चिमेतील योगीधाम, गौरीपाडा परिसरातील लॉर्ड सोसायटीत राहणाऱ्या डॉ. हर्षाली पवार यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार रविवारी सकाळी ७.३० च्या सुमारास त्यांच्या सोसायटीत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
---------------------------