कल्याण- एका कारची भरदिवसा काच फोडून सुमारे ६० ते ७० लांखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली. हि घटना कल्याण पूर्वेकडील हॉटेल सरोवरसमोर घडली असून घटनास्थळी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. मात्र भरदिवसा घडलेल्या या जबरी चोरीमुळे कल्याण पूर्वेत खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात राहणारे बांधकाम व्यवसायिक अजय सिंग यांनी दुपारी १.४५ वाजल्याच्या सुमाराला कोळसेवाडी येथील अभ्युदय बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवलेले प्लास्टीकच्या पिशवीतील दागिने लॉकर्स मधून काढून कारच्या मागील डाव्या सीटवर दागिन्यांची पिशवी ठेवली. त्यानंतर अजय सिंग हे आपल्या घराकडे जातांना त्यांनी कार हॉटेल सरोवर समोर रस्त्याच्या कडेला उभी करून ते तिसाई हाऊस येथील नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्याच सुमाराला अवघ्या दहा मिनीटांच्या कालवधीत चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून सुमारे ६० ते ७० लांखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. मात्र भरदिवसा काच फोडून लाखोंचे दागिने लंपास करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.
भरदिवसा कारची काच फोडून सुमारे ६० ते ७० लांखाचे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 3:25 PM