मुरबाड : संपूर्ण ठाणे जिल्ह्यात बंद पडलेल्या औद्योगिक कारखान्यांत तेथील सुरक्षारक्षकांच्या मदतीनेच भंगाराची चोरी करणाऱ्या टोळीला रंगेहाथ जेरबंद करण्यात मुरबाड पोलीस यशस्वी झाले आहेत. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याचे संकेत आहेत. या गुन्ह्यात महंमद अली, मकसुद अली मण्यार, महंमद शकिल, महंमद खलील, लखन विश्राम, प्रभू वर्मा, रामशदल नंदराम वर्मा, अब्दुल रहमान मण्यार, राजेंद्र नंदकुमार वर्मा, सोनुकुमार आदम हरजिन, नथुराम कृपाल चौबे, कमरु द्दीन अब्दुल जबारखान आणि संजय खडेश्वर राजभर यांना अटक केली असून न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.मुरबाड-कर्जत महामार्गावर काकडपाडा येथील झेनीथ बिर्ला ही लोखंडी पाइप तयार करणारी कंपनी अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे त्या कंपनीतील महागडी मशिनरी आणि सुट्या भागांवर देखरेख करण्यासाठी वीरेंद्र सिक्युरिटी फोर्स या कंपनीचे व्यवस्थापक वीरेंद्र पाठक यांना कंपनीने सुरक्षेचे कंत्राट दिले. मात्र, त्यांनीच या बंद कंपनीतील महागड्या मशीन आणि सुटे भाग भंगारात विकण्यासाठी एका टोळीला हाताशी धरून कंपनीतील भंगार पळवले. २१ तारखेला कंपनीत येऊन एक ट्रक भंगार घेऊन गेला, याची चाहूल कंपनीचे व्यवस्थापकाशी संलग्न असलेले प्रभाकर साबळे यांना कळताच त्यांनी मुरबाड पोलिसांना खबर दिली. मुरबाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भंगारचोरी टोळीतील काही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
बंद कंपन्यातील भंगार चोरणारी टोळी जेरबंद
By admin | Published: January 24, 2017 5:37 AM