कल्याण : बँक व एटीएमबाहेर रोकड घेऊन येणा-यांना पोलीस असल्याची बतावणी करत लुटणाºया ज्ञानेश्वर थोरात आणि संदीप लांडगे या दोघा तोतयांना मोठ्या शिताफीने पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या तोतया पोलिसांचा तिसरा साथीदार फरार झाला आहे.साध्या वेशातील दोघे जण पोलीस असल्याची बतावणी करत व हातात पोलिसांचा लोगो असलेले की-चेन असल्याचे भासवून ‘तुमच्याकडे बनावट नोटा असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. त्यामुळे या नोटा आम्हाला तपासणीसाठी लागतील’, अशी थाप मारून ती रोकड घेऊन पसार व्हायचे. अशा स्वरूपाच्या तक्र ारी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या तोतया पोलिसांच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती.कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ मार्केटमध्ये आठ महिन्यापांसून सापळा लावून या पोलिसांचा शोध सुरू केला होता. अखेर, दोघे तोतया पोलीस उल्हासनगरमध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे या दोघांना सापळा लावून अटक करण्यात आली. या दोघांचा आणखी एक साथीदार असून तो फरार झाला आहे.ओळखपत्र, दुचाकी जप्त-आरोपींकडून पोलिसांचा लोगो असलेले की-चेन आणि इलेक्ट्रॉनिक-प्रिंट मीडियाचे पत्रकार असलेले ओळखपत्र व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. कल्याण न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.हे तोतया पोलीस, पत्रकार म्हणून गुन्ह्यांसंबंधित बातम्यांवर नजर ठेवून असत व वेळोवेळी आपली वेशभूषा बदलत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.
बनावट नोटांच्या नावाखाली लुटमारी,एक फरार : दोघा तोतया पोलिसांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:51 AM