- अजित मांडके ठाणे : शहरात जवळपास लोकसंख्येइतकीच वाहनांची संख्या झाल्यामुळे पार्किंगची गंभीर समस्या बनली आहे. पार्किंगची ही समस्या सोडवण्यासाठी रोबोट पार्किंग ही अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नव्या वर्षात महापालिका मुख्यालयासमोरील रस्ता आणि गडकरी रंगायतन येथे ही संकल्पना राबवली जाईल, अशी माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे ठाणेकरांसाठी नव्या वर्षाची ही खास भेट ठरणार आहे.शहरातील अरुंद रस्ते, वाढती वाहने आणि रस्त्यांवर उभी राहणारी बेशिस्त वाहने यामुळे विविध भागांत वाहतूककोंडी होताना दिसते. त्यासाठी गावदेवी भाजी मंडई, रेल्वे स्थानक परिसर, पोखरण रोड नं.२ आदींसह गावदेवी मैदान येथे भूमिगत पार्किंगची सुविधाही राबवली जात आहे. तसेच नाल्यावर पार्किंग सुरू केली आहे. आणखी दोन ठिकाणी नाल्यावरील पार्किंग सुरू करण्याचा मानस आहे. मात्र, आता आहे त्या जागेत वाहतूककोंडी न होता रोबोट पार्किंग ही अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हस्के यांनी दिली. पहिल्या टप्यात दोन ठिकाणी हा प्रयोग केला जाणार आहे. यामध्ये महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर आणि गडकरी रंगायतनजवळ असलेल्या बाजूच्या जागेवर हा प्रयोग केला जाणार आहे. यासंदर्भात पहिली बैठक पार पडली असून नव्या वर्षात दोन ठिकाणी हा पायलेट प्रोजेक्ट म्हणून राबवला जाणार आहे.असा असेल प्रकल्पअतिशय कमी जागेत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपले वाहन त्याठिकाणी सोडायचे. तेथून रोबोट तुमचे वाहन नेऊन ठरलेल्या जागेत पार्क करणार आहे. परदेशात ही संकल्पना राबवली जात असून ही ठाण्यातही ही सुविधा सुरू करण्याचे विचाराधीन आहे. रस्त्याच्या मधोमधसुद्धा ही सुविधा उपलब्ध करून देता येईल, असे महापौरांनी सांगितले.याशिवाय परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
ठाण्यात रोबोट करणार वाहन पार्किंग; महापालिकेचा नव्या वर्षातील प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 12:30 AM