जव्हार : या तालुक्यात रोजगाराभावी रोहयो मजुरांचे स्थलांतर सुरूच आहे. त्यातच ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने, अधिकारी वर्ग गेल्या महिनाभरापासून निवडणुकीच्या कामाला लागला होता. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्र मगड या ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेची कामे ठप्पच झाली होती. त्यातच शासनाच्या कोणत्याही यंत्रणांकडून वेळेत रोजगार मिळत नसल्याने, हे उन्हाळी दोन महिने रोजगाराच्या शोधात डोक्यावर बाचके घेऊन, लहान मुलांच्या हातात हंडे देऊन, संपूर्ण कुटुंबासह तांडेच्या तांडेरोजगाराच्या शोधात पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतराला निघाल्याचे चित्र जव्हारच्या बसस्थानकावर बाघायला मिळत आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या खरी, मात्र जव्हार, मोखाडा, व विक्र मगड या आदिवासी ग्रामीण भागात शासनाच्या अधिक-यांच्या ढिसाळ कारभारामुळे रोजगार हमी योजनेची कामे वेळेत मिळत नाहीत. रोजगार हमीवर काम केलेली मजुरी बॅँक व पोस्ट खात्यात मजुरांच्या खात्यावर जमा होत असल्याने, ग्रामीण आदिवासी भागात काम करणा-या अधिकारी वर्गाला भ्रष्टाचार करता येत नसल्याने अधिकारीवर्गही रोजगाराची कामे करण्यास उत्सुक नसतात. तसेच रोहयो मजुरांनी यंत्रणांकडे कामाची मागणी केल्यास एखादे थातूर-मातूर रोजगार हमीचे काम देऊन मोकळे व्हायचे, आपल्या अंगावरील काटे दूर करायचे असा प्रकार या आदिवासी ग्रामीण भागात चालू आहे. त्यामुळे नाईलाजास्तव येथील शेकडो रोहयो मजुरांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे.जव्हार तालुक्यात एकूण- २३हजार५४६ एवढी रोहयो मजुरांची जॉबकार्डे जव्हारच्या रोहयो विभागात नोंदविण्यात आलेली आहेत. मात्र या एप्रिल महिन्यात तर रोजगार हमीच्या कामावर मजूरच लावण्यात आले नाहीत. त्यातच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे कारण देत अधिकारीही सुस्तावले आहेत. म्हणून रोजगार हमीवर कामं मिळत नसल्याने शेकडो रोहयो मजूर रोजगार मिळण्यासाठी स्थलांतरीत होत आहेत. ग्रामीण आदिवासी भागात रोजगाराभावी मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होते आहे.
जव्हार तालुक्यात रोहयो मजुरांचे स्थलांतर सुरूच
By admin | Published: April 21, 2016 2:07 AM