जव्हार : लॉकडाउनमुळे रोजंदारी कामगार, मजूरवर्गावर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाली, मात्र या कामांची मजुरी बँकेत येते, ही मजुरी काढायची असेल तर मजुरांना आपल्या घरातून पहाटेच बँकेच्या दिशेने रवाना होऊन रांगेत नंबर लावावा लागतो. नंबर लागला तर आज, नाहीतर परत उद्या अशी व्यथा येथील मजूर मांडत आहेत.
शासनाच्या काही आडमुठ्या नियमांचा फटका या मजूरवर्गाला चांगलाच बसत आहे. मजुरी जमा झाली की नाही, हे बघण्यासाठी खेडोपाड्यांतून मजूर पायी जव्हारला येऊन सकाळ ते संध्याकाळ बँकेच्या बाहेर भरउन्हात ताटकळत रांगेत उभे राहताना दिसत आहेत. यात महिला मजूरवर्गाची समस्या फार मोठी आहे. सकाळीच घरातील कामे आटोपून, स्वयंपाक करून रोजगार हमीवर केलेल्या कामाची मजुरी खात्यात जमा झाली की नाही, हे बघण्यासाठी जव्हारला यावे लागते. ज्यांच्याकडे स्वत:ची दुचाकी आहे, ते लोक आपापल्या नातेवाईक मंडळींना बरोबर घेऊन लवकर निघून जातात, मात्र जे पायी येतात, त्यांचा वेळ जातो. उन्हातान्हात आम्ही जेमतेम बँकेजवळ पोहोचतो, मात्र अगोदरच मोठी रांग बँकेसमोर असल्याची व्यथा मांडली.
निराधार व्यक्तींचे हाल : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत तालुक्यात हजारो लाभार्थी आपले मासिक एक हजाराचे मानधन घेण्यासाठी बँकेत भररांगेत उभे राहत आहेत. निराधार व्यक्ती वयस्क असतात, नाहीतर अपंग, नाहीतर विधवा. आधीच ही व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून असते, त्यात बँकेच्या लांबलचक रांगेत उभे राहून हाल होत आहेत. याबाबत डेंगाचीमेट येथील सोमा शंकर कोटील हा एका पायाने अपंग निराधार लाभार्थी मानधन घेण्यासाठी सकाळपासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा जव्हार येथे रांगेत उभा होता. त्यांचा नंबर जवळपास बँकेपासून १२० ते १५० मीटर लांब रांगेत होता. बँकेकडून अशा अपंगांसाठी कुठलीच सोय न केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.