ठाणे : कोरोनाचे रुग्ण वाढीस लागल्यामुळे ठाण्यात नाइलाजास्तव लाॅकडाऊन लावावा लागला आहे. पण, या काळात गोरगरिबांचा रोजगार बुडत जात आहे. याकडे लक्ष देऊन केंद्र, राज्य आणि ठामपाने लाॅकडाऊन काळात नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवावे; सर्व शाळा-महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी ठामपाचे विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे.
ठाणे पालिकेने लाॅकडाऊन जारी केल्यानंतर नागरिकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्याची मागणी करणारे पत्र शानू पठाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठामपा आयुक्तांना दिले आहे. यासाठी ठामपाने राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृती आराखडा तयार करावा, अशीही मागणी पठाण यांनी केली आहे.