ठाणे : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक - संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘रक्ताचं नातं या मोहिमेंतर्गत लोकमत आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल यांच्या पुढाकाराने तसेच, रोटरी क्लब ऑफ ठाणे स्कायलाईन व रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रीक साईड यांच्या सहभागाने रविवारी नौपाडा येथील कै. वामन राव ओक रक्तपेढी येथे रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी ठाणेकरांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी संपूर्ण वर्षभर ड्रॉप ऑफ होप हा प्रकल्प राबविण्याचे आश्वासन यावेळी रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
लोकमतने सुरू केलेल्या रक्तदान शिबिराला सलग तिसऱ्या दिवशी ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. थायलेसेमियामुक्त ठाणे शहर करण्याच्या दृष्टीने रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ दरवर्षी ड्रॉप ऑफ होप हा प्रकल्प राबवित असते. लोकमतने सुरू केलेल्या रक्ताचं नातं या मोहिमेत रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल यांनी पुढाकार घेऊन ड्रॉप ऑफ होप या प्रकल्पाअंतर्गत आयोजित शिबिरात रविवारी अनेक रोटेरीयन आणि रोटरॅक्टर्सनी स्वतः रक्तदान करून सहभाग घेतला.
या रक्तदान शिबिराला ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी भेट देऊन आजच्या उपक्रमाचे व रोटरीच्या वार्षिक कार्यक्रमाचे कौतुक केले. शिबिराचे उद्घाटन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२च्या मुख्य समन्वयक नेहा निंबाळकर यांच्या हस्ते, तर असिस्टंट गव्हर्नर अच्युत भोसेकर यांच्या उपस्थितीत झाले. हा कार्यक्रम मिलिंद कुलकर्णी यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडला. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२चे पब्लिक इमेज प्रतिनिधी ऋषिकेश डोळे, रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रीक साईडचे सचिव मृशाद वोरा, रोटरी क्लब ऑफ ठाणे स्कायलाईनच्या संगीता कपूर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२च्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख शीतल थोरात यांनीदेखील उपस्थिती लावली होती.
यावेळी रोटरीचे क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि कै. वामनराव ओक रक्तपेढी यांच्या झालेल्या चर्चेत असे लक्षात आले की, ठाण्याची लोकसंख्या २३ लाख असूनही साधारण वार्षिक रक्तदान ६० ते ७० हजार बाटल्या इतकेच होते. ही संख्या तुलनेने खूप कमी आहे. त्यामुळे कै. वामनराव ओक रक्तपेढीने आवाहन केले की, रोटरी क्लबने या विषयी जनजागृती करावी. आजही रक्तदानाविषयी जनतेमध्ये भय आहे. तसेच, जनजागृतीदेखील होत नाही. रक्तपेढीत रक्तासाठी आल्यावर काही लोकांना परत जावे लागते. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या अध्यक्षा ॲड. सलोनी घुले यांनी आश्वासन दिले की, या वार्षिक कार्यक्रमाचे स्वरूप मासिक कार्यक्रमात करू. जेणेकरून जास्तीत जास्त संख्येने रक्तदान होईल आणि रक्ताचा तुटवडा शहरात जाणवणार नाही. अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी ठेवल्यावर रोटरी क्लब ऑफ ठाणे स्कायलाईनच्या अध्यक्षा मृणाल सुर्वे व रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रीक साईडचे अध्यक्ष मंदार पंडित यांनी लगेचच या प्रस्तावाला सहमती दर्शविली. या चर्चेत कै. वामनराव ओक रक्तपेढीच्या कविता वालावलकर, अजय पाठक, मुकुंद बेलसरे, किरण वैद्य हे पदाधिकारी हजर होते. तसेच, रोट्रॅक्ट क्लब ऑफ ठाणे क्रीक साईड व रोट्रॅक्ट क्लब ऑफ ठाणे सेंट्रल यांच्या रोटरॅक्टर्स यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांत आम्ही श्रमदान करू, असे आश्वासन दिले. या बदल घडविणाऱ्या उपक्रमाचे कै. वामनराव ओक रक्तपेढीने स्वागत केले. तसेच, त्यांनी वामनाय नमः हे पुस्तक रोटरीच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना भेट म्हणून दिले.
-------------