डोंबिवली : औद्योगिक निवासी भागातील सोसायट्यांना अंतिम भाडेकरार करण्यासाठी मुद्रांक शुल्क व त्यावर ४०० पट दंडात्मक रक्कम आकारण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेली नोटीस अयोग्य आहे. याप्रकरणी लवकरच तोडगा काढण्यासाठी कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी पुढाकार घेतला आहे. अंतिम भाडेकरार करण्यासाठी अर्ज करणाऱ्या सोसायट्यांना मुद्रांक शुल्क व ४०० पट दंड आकारण्याची नोटीस मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये १४ मार्चला प्रसिद्ध झाले होते. त्याची गंभीर दखल भोईर तसेच केडीएमसीतील सभागृह नेते राजेश मोरे यांनी घेतली आहे. भोईर व मोरे यांनी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता निवासी भागातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांची भेट घेतली. या वेळी नागरिक या प्रश्नावर भोईर यांना घेराव घालणार होते. मात्र, भोईर त्यांच्या बाजूने भूमिका घेणार असल्याचे कळताच घेराव घालण्याचा विचार नागरिकांनी बदलला. या वेळी नागरिकांनी भोईर व मोरे यांच्याशी चर्चा केली. (प्रतिनिधी)
मुद्रांक शुल्कप्रकरणी लवकरच मार्ग
By admin | Published: March 16, 2017 2:48 AM