भातसानगर : सणवार आणि लग्नसमारंभात केळीच्या पानावर वाढलेले जेवण आणखीनच रुचकर लागते. पानावर वाढलेले वरण-भात, भाजी, लाेणचे, चटणी आणि त्यासाेबत असलेले गाेड पदार्थ पाहूनच मन तृप्त हाेत असे. मात्र, हल्ली केळीच्या पानांची ही पंगत ग्रामीण भागातही लुप्त झाली आहे. केळीच्या पानांची जागा आता प्लास्टिक आणि थर्माकाेलच्या पत्रावळ्यांनी घेतल्याने केळीच्या पानावर जेवण्याचे समाधान दुर्मीळ झाले आहे.
ग्रामीण भागात घराच्या परसात केळीची झाडे हटकून असायची. मात्र, हल्ली केळवडच क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे केळीची पानेच मिळेनासी झाली आहेत. त्यामुळे अनेकदा देवाला नैवेद्य दाखविण्यासाठीही केळीची पाने मिळवताना कठीण हाेऊन बसते. त्यामुळे लग्नसमारंभातील केळीच्या पानातील जेवणावळही नामशेष झाल्याने पानावर ओसंडून वाहणारे वरण, भाजीचा रस्सा घासागणिक जमा करतानाचे पंगतीतील चित्र पाहायला मिळत नाही. पानातील जीवनसत्त्व अन्नात उतरून भाेजन अधिकच रूचकर लागते. मात्र, आता केळीच्या पानांची जागा केमिकलमिश्रित पत्रावळ्यांनी घेतली आहे. थर्माकाेल, प्लास्टिकच्या पत्रावळ्यांमुळे पर्यावरणालाही हानी पाेहाेचत आहे.
पर्यावरणपूरक पत्रावळींचा वापर हवा
केळीची पाने, पळस व कुड्याच्या पानांनी बनविलेली पत्रावळी ही विघटन होणारी, खत निर्माण करणारी, मशागतीसाठी उपयुक्त असल्याने त्यांचा पर्यावरणावर कोणताही घातक परिणाम होत नाही. शिवाय, पोटात केमिकल जात नाही. त्यामुळे मानवी आरोग्यासही उपयुक्त असते. ग्रामीण भागात पानांच्या व केळीच्या पानावर जेवण्याची परंपरा कमी झाली असली तरी आज ना उद्या लोक पानांच्या पत्रावळीचा नक्की उपयोग करतील आणि त्यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल, असा आशावाद आदिवासी संघटनेचे नेते पद्माकर केवारी यांनी व्यक्त केला.