लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) रेल्वेची मालमत्ता, प्रवाशांचे संरक्षण व रेल्वेच्या हद्दीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. सप्टेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१ या वर्षभरात आरपीएफने रेल्वे मालमत्तेच्या चोरीची ३२७ प्रकरणे उघडकीस आणली. तर, ३४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याव्यतिरिक्त हॉकिंग, स्त्रियांच्या व अपंगांसाठी राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या २९ हजार ४८६ व्यक्तींविरोधात रेल्वे कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
आरपीएफचा स्थापना दिवस २० सप्टेंबरला साजरा झाला. त्यानिमित्ताने वरील माहिती देण्यात आली. रेल्वे प्रवासातील गुन्हे नियंत्रित करण्यासाठी आणि शासकीय रेल्वे पोलिसांना मदत करण्यासाठी आरपीएफने १२३ चोरांना पकडून लोहमार्ग पोलिसांकडे सोपविले आहे. तसेच ६४ दरोड्यांचे गुन्हेही उघडकीस आणले आहेत. आरपीएफने सात अपहरणकर्ते, विनयभंग करणारे तिघे, तीन मारेकरी आणि राज्य पोलिसांचे १० इतर वाँटेड गुन्हेगारही पकडले आहेत.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ ‘मेरी सहेली’ योजना राबवत आहे. त्यात महिला प्रवाशांची शक्यतो महिला आरपीएफ कर्मचारी दखल घेऊन उपस्थित राहतात, जेणेकरून महिला प्रवाशांना रेल्वे प्रवासात कोणत्याही अडचणी येत नाहीत, याची खात्री होईल, असा विश्वास जनसंपर्क अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे व्यक्त केला.
आरपीएफच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१ दरम्यान ४३ प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. ‘मिशन झीरो डेथ’ या प्रकल्पाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. विविध योजनांच्या अंमलबजावणीमुळे अतिक्रमण, खाली पडणे इत्यादींमुळे लोकांचा मृत्यू किंवा इजा होणे कमी झाले आहे. यासंदर्भात व्यापक जागृती मोहीम हाती घेतली आहे. ५९ प्रकरणांमध्ये, आरपीएफने एनडीपीएस कायद्यांतर्गत गांजा, सिगारेट, दारू इत्यादी प्रतिबंधित वस्तू जप्त केल्या आहेत.
दरम्यान, आरपीएफने स्थापना दिनानिमित्त मागील आठवड्यात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, चर्चासत्रे, वादविवाद, चर्चा, कौटुंबिक बैठक, क्रीडा उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध उपक्रम आयोजित केले होते.
३७९ प्रवाशांना परत केल्या हरवलेल्या वस्तू
- १३९ रेल मदत हेल्पलाइनद्वारे आरपीएफ कर्मचारी प्रवाशांना मदत करतात किंवा त्यांच्या तक्रारींची दखल घेतात आणि रिअल टाइम मदत अथवा तक्रारीचे निवारण करतात.
- मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन प्रवाशांना व गरजूंना मदत केली आणि हरवलेले सामान शोधून प्रवाशांना परत केले आहेत. ३७९ प्रवाशांचे मोबाइल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख इत्यादी मौल्यवान वस्तू परत केल्या.
-----------------------------