लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दिव्यातील जलद महिला लोकलचे दरवाजे महिला अडवतात, त्यामुळे डब्यात चढता येत नसल्याने दिव्यात महिलांनी केलेल्या रेल रोको आंदोलनानंतर दिवा आरपीएफ पोलिसांनी तेथे सकाळी-संध्याकाळी या दोन्ही गर्दीच्या वेळेस दरवाजा अडवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला; मात्र ही कारवाई महिला डब्यात करण्याऐवजी पुरुषांच्या डब्यात सुरू असल्याचे दिसत आहे. पुरुषांच्या डब्यात कारवाई होते, तर महिलांच्या डब्यात कारवाई का होत नाही, याबाबत विचारणा केल्यावर महिलांच्या डब्यात कारवाई करण्यासाठी दिवा आरपीएफ पोलिसांकडे एकही महिला अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. दिवा आरपीएफकडे जे महिला कर्मचारी होते, त्यांची बदली झाली असून सद्य:स्थितीत एकही महिला स्टाफ नसल्याचे सांगण्यात आले.
सकाळी कर्जतहून सुटणाºया सीएसएमटी जलद लोकलचा दरवाजा महिला अडवून धरतात. त्यामुळे दिव्यातील महिलांना चढता येत नाही. तरीसुद्धा महिला डब्यात चढल्या, तर त्यांना मारहाण करणे, ढकलणे, चावणे यासारखे प्रकार घडत असल्याने संतप्त महिलांनी ४ एप्रिल रोजी रेल रोको केला. याप्रकरणी दिवा आरपीएफ पोलिसांनी आठ ते दहा महिलांवर गुन्हे दाखल केले. सहा महिलांच्या अटकेची कारवाईही केली आहे. याचदरम्यान आरपीएफ पोलिसांनी दरवाजा अडवणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारला आहे. शनिवार आणि रविवार हे सुटीचे दोन दिवस वगळता, इतर तीन दिवसांत पोलिसांनी पुरुष डब्यात एकूण १६ जणांवर कारवाई केली आहे. मात्र, या कालावधीत महिला डब्याचे दार अडवणाºया एकाही महिलेवर कारवाई न केल्याची बाब पुढे आली.
दिवा आरपीएफकडे एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार महिला पोलीस कर्मचारी असा पाच जणांचा स्टाफ होता. मात्र, त्यांची आंदोलन होण्यापूर्वीच पुणे, सोलापूर आदी ठिकाणी बदली झाली होती. आंदोलन झाले त्यावेळी त्या स्टाफला बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नव्हते. त्यानंतर, दोन दिवसांनी स्टाफला येथून बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आल्याने सद्य:स्थितीत एकही महिला स्टाफ नाही. महिला डब्यात कारवाई करण्यासाठी महिला पोलिसांची आवश्यकता असते. पण, महिला कर्मचारीवर्ग नसल्याने महिला डब्यात कारवाई करता येत नाही. महिला अधिकारी-कर्मचारी मिळाल्यावर त्या डब्यातही दरवाजा अडवणाºयांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.
३५ मंजूर पदे : दिवा-पनवेल आणि दिवा-वसई हे दोन मार्ग दिवा रेल्वे सुरक्षा बल पोलीस ठाण्यांतर्गत येतात. या दोन्ही मार्गांवर एकूण १६ रेल्वेफाटक आहेत. दिवा रेल्वेस्थानकातील वाढती प्रवासीसंख्या पाहता, आरपीएफची मंजूर पदे त्या तुलनेत खूपच कमी आहेत. त्यातच, बदल्यांमुळे सद्य:स्थितीत ही संख्या निम्म्यावर आली असून या पोलीस ठाण्याला मिळणारी १० जणांची फौज अद्यापही मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.