ठाणे: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधामुळे चप्पल शिवण्याचा व्यवसाय करणार्या गटई कामगारांची उपासमार होत आहे. यासाठी गटई कामगारांना व्यवसाय करण्याची मुभा द्यावी , या मागणीसाठी रिपाइं एकतावादीचे नेते भय्यासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजभाऊ चव्हाण यांनी शोलेस्टाईल आंदोलन केले.
लॉकडाऊनमुळे विविध समाजघटकांवर विपरीत परिणाम झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्या वर्गाची मोठया प्रमाणात उपासमार होत आहे. ठाणे शहरात रस्त्याच्या कडेला चप्पल शिवण्याचा व्यवसाय करणारे चर्मकार या लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागले आहेत. या गटई व्यवसायाला निर्बंधामधून वगळावे , या मागणीसाठी राजाभाऊ चव्हाण यांनी अनेकवेळा ठामपाशी तसेच जिल्हाधिकार्यांशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच शहरातील विकास प्रकल्पांमुळे बाधीत झालेल्या गटई कामगारांच्या स्टॉलचे स्थलांतरीत करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे. मात्र या दोन्ही मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने राजाभाऊ चव्हाण यांनी कोपरीतील आनंद टॉकीजसमोर बांधण्यात येणार्या सॅटीस पुलाच्या पिलरवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले. सुमारे दोन तासभर त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले होते.