भिवंडी- राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत, इंद्र देवाराम मेघवाल नावाच्या एका विद्यार्थ्याने मुख्यध्यापक छैलसिंह यांच्या माठातून पाणी घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे छैलसिंह यांनी या आठ वर्षाच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ, आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेलार मिठपाडा ते भिवंडी तहसीलदार कार्यालय, अशा निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या घटनेचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावी, तसेच मारहाण करणाऱ्या मुख्यध्यापकाला कठोर शासन व्हावे, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी, आरपीआय सेक्युलरचे कार्यकर्ते आकाश साळुंखे, प्रदीप गायकवाड,अजिंक्य गायकवाड, दिनेश जाधव, अमोल तपासे, रवी सोनावणे यांच्यासह महिला व नागरिकांसह शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते.
तहसील कार्यालयासमोर पोलोसांनी या मोर्चास अडवल्यानंतर मोर्च्याचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी मयत विद्यार्थी इंद्र मेघवाल हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. यानतर सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड किरण चन्ने यांच्यासह शिष्ठमंडळाने भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सोपविले. तसेच, या घटनेची दाखल केंद्र सरकारसह राजस्थान सरकार व देशाच्या राष्ट्रपतींनी घ्यावी आणि मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी यात करण्यात आली आहे.