डोंबिवली - गरीब फेरीवाल्यांवर हल्ला झाला तर भीमसैनिक मनसैनिकांना चोख उत्तर देतील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्यानंतर, डोंबिवलीतील रिपाइंचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. डोंबिवलीतील फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी रिपाइंचे कार्यकर्ते रस्त्यात उतरणार असल्याची माहिती रिपाइंचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी दिली.मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शनिवारी ठाणे, कल्याण आणि डोंबिवली रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड करून, त्यांच्यावर हल्ला करून आंदोलन छेडले होते. त्यांच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी मनसेला इशारा दिलाय. फेरीवाल्यांच्या होणाऱ्या त्रासाची तक्रार पोलीस अथवा प्रशासनाकडे करावी. मात्र मनसेने कायदा हातात घेऊ नये. त्यांच्यावर हल्ला केलास भीमसैनिक चोख उत्तर देतील. गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत त्यांच्यावर हल्ला करण्यापेक्षा मनसैनिकांनी लष्करात जाऊन सीमेवर्ती देशाच्या दुष्मनांशी लढावे असा खोचक सल्ला ही आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला होता. आठवले यांनी केलेल्या आवाहनानंतर डोंबिवलीतील रिपाइंचे सर्व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. डोंबिवलीतील सर्व फेरीवाल्याच्या पाठीशी रिपाइंचे कार्यकर्ते खंबीरपणे उभी राहणार आहे असे अंकुश गायकवाड यांनी सांगितले. फेरीवाले हे एकटे आहेत असे मनसेने समजू नये. यापुढे फेरीवाल्यावर हल्ला कराल तर याद राखा असा इशाराही गायकवाड यांनी दिलाय.
फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी रिपाइं रस्त्यात उतरेल - अंकुश गायकवाड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 3:56 PM