कल्याण : खाजगी कोविड रुग्णालये रुग्णांकडून उपचारापोटी जास्तीचे बिल आकारत आहे. याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेने जास्तीच्या बिलांवर बोट ठेवून संबंधित रुग्णांलयांकडून खुलासा मागविला आहे. यानंतर ४९.९३ लाखांपैकी तब्बल २४ लाख ७९ हजार रुपये रुग्णांना त्यांनी परत केले आहेत. या कारवाईमुळे रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे.
मनपाचे लेखा अधिकारी सत्यवान उबाळे यांनी ही माहिती दिली आहे. कोविड रुग्णालयातील रुग्णांकडून सरकारी दराप्रमाणे बिल आकारणे बंधनकारक आहेत. मात्र, खाजगी रुग्णालये मनमानीपणे बिल आकारत आहेत. ते भरले नाही तर रुग्णाला डिस्चार्ज दिला जात नाही. या संदर्भात मनपा प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त होत आहे. या तक्रारींची दखल घेऊन मनपाने बिल तपासणी मोहीम सुरू केली आहे. मनपा हद्दीतील १६ रुग्णालयांनी रुग्णावर उपचार केल्याच्या बदल्यात विविध रुग्णालयांकडून एक कोटी २८ लाख ७५ हजारांचे बिल आकारले होते. या एकूण बिलांच्या रक्कमेपैकी ४९ लाख ९३ हजार ६७९ रुपये जास्तीचे आकारल्याने त्यावर मनपाने आक्षेप नोंदविला होता. त्यापैकी २४ लाख ७९ हजार रुपये रुग्णांना परत केले आहेत. उर्वरित २५ लाख १२ हजारांची रक्कम संबंधितांकडून वसूल होणे बाकी आहे. त्यासंदर्भात रुग्णालयाकडे मनपाने खुलासा मागविला आहे. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा मिळाला नाही तर ही रक्कम वसूल केली जाणार आहे.‘ही’ आहेत रुग्णांची लूटमार करणारी रुग्णालयेरुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांत ऑप्टीलाइफ, साई हॉस्पिटल, ए अॅण्ड जी, नाहर, मेडीहोम, सिद्धिविनायक, श्वास, स्वामी समर्थ, साई आरोग्यम्, नोबेल, श्रीदेवी आणि आयकॉन यांचा समावेश आहे. यापैकी जास्तीच्या बिलाबाबत सगळ्यात जास्त आक्षेप ए अॅण्ड जी रुग्णालयाचे आहेत. त्यापैकी बहुतांश आक्षेप त्यांनी मान्य करून रुग्णांना त्यांची रक्कम परत केली आहे. काही रुग्णांना त्यांचे पैसे हे धनादेशाद्वारे, रोख स्वरूपात परत केले आहेत. तर काहींनी त्यांच्या जास्तीच्या बिलाची रक्कम बिलात वळती करून बिल कमी करुन घेतले आहे. कल्याण महापालिकेच्या अपेक्षांना दाद न देणाºया दोन रुग्णालयांचा कोविड परवाना रद्द करण्याची कारवाईदेखील यापूर्वी महापालिकेने केली आहे.