सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : हजार, पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारणार असल्याचे आरबीआय अर्थात रिजर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वीच घोषीत केले. यानुसार ७६ कोटी ७८ लाख २७ हजार ५०० रूपयांच्या पडून असलेल्या जुन्या नोटा जमा करण्याचा प्रयत्न ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) केला. मात्र, त्या न स्वीकारता केवळ लेखी पत्र घेऊन नोटा स्वीकारण्याचा दिनांक आणि वेळ रिझर्व्ह बँक काही दिवसांनी कळवणार असल्याची माहिती टीडीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर यांनी लोकमतला दिली. नोटाबंदी होताच जिल्ह्यातील २७ राष्ट्रियीकृत बँका, १७ को-आॅप बँका आदींच्या सुमारे एक हजार बँक शाखांमधील ३५ हजार कोटींच्या जुन्या नोटा नोव्हेंबरमध्येच रिजर्व्ह बँकेने स्वीकारल्या आहेत. मात्र, टीडीसीसी बँक व तिच्या १०२ शाळांमध्ये जमा झालेल्या हजार, पाचशेच्या सुमारे ७७ कोटींच्या जुन्या नोटा अद्याप स्वीकारलेल्या नाहीत. यामुळे कडक सुरक्षेत बँकेच्या लॉकरमध्ये त्या पडून आहेत. या पडून असलेल्या रकमेवर सुमारे ८४ हजार २४० रूपये व्याज दरदिवशी बँकेला भरावे लागत आहे. राष्ट्रीयकृत व व्यापारी, सहकारी बँकांच्या जुन्या नोटा तत्काळ स्वीकारल्याने त्यांना व्याजाच्या रकमेचा भुर्दंड बसलेला नाही. परंतु,शेतकऱ्यांच्या या बँकेला आतापर्यंत दोन कोटी आठ लाख ३८ हजार रुपये व्याजाच्या रकमेचा भुर्दंड सोसावा लागला आहे. जोपर्यंत या नोटा रिजर्व्ह बँक स्वीकारणार नाही, तोपर्यंत प्रत्येक दिवशी ८४ हजार २४० रूपये व्याज टीडीसीसीला भरावा लागणार असल्याचे भोईर यांनी सांगितले. बँकेत सध्या एक हजाराच्या नोटांचे ५० कोटी ८२ लाख ४७ हजार रूपये आहेत. यामध्ये पाच लाख आठ हजार २४७ नोटा आहेत. उर्वरित २५ कोटी ९५ लाख ८० हजार ५०० रूपये बँकेच्या लॉकरमध्ये पडून आहेत. या ७६ कोटी ७८ लाख २७ हजार ५०० च्या रकमेवर ४ टक्के व्याज टीडीसीसी बँक दिवसाला भरत आहेत.
७६ कोटींच्या नोटा बँकेत पडून
By admin | Published: June 27, 2017 3:12 AM