बदलापूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपपाठोपाठ राष्ट्रीय समाज पक्षही (रासप) रस्त्यावर उतरला आहे. बदलापुरात रासपचे ठाणे जिल्हाध्यक्ष रुपेश थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी चक्का जाम आंदोलन केले.
सकाळी पावणेबाराच्या सुमारास बदलापूर पूर्व भागातील उड्डाणपुलाजवळ हे आंदोलन करण्यात आले. ‘ओबीसी आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी, ओबीसी जनगणना झाली पाहिजे’, असे फलक हाती घेऊन घोषणाबाजी करीत राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते उड्डाणपुलाच्या दिशेने आले. त्यावेळी पोलिसांनी अडवल्यानंतर आंदोलकांनी तेथील रस्त्यावर ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. मात्र, थोड्याच वेळात पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. रुपेश थोरात यांच्यासह दादा देवकते, राहुल दोलताडे, समाधान कोळेकर, औदुंबर कोळेकर, गोरख कोळेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
-------