डोंबिवली - भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रा.स्व. संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या शस्त्रपूजनाला आक्षेप घेतला आहे. पण असे असले तरीही संघाच्या ठिकठिकाणच्या नगरश:, जिल्हाश: होणाऱ्या उत्सवांंमध्ये पारंपारिक पद्धतीने शस्त्रपूजन केले जाणार आहे. संचलनात गणवेश घालणार की नाही हा प्रश्न जसा विचारला जाऊ शकत नाही, तसेच शस्त्रपूजन केले जाणार की नाही? हा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही स्पष्टीकरण संघाचे क्षेत्र प्रचार विभाग प्रमुख प्रमोद बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.
लोकमत प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ज्याप्रमाणे आपण घराला कुलूप लावतो, ते कशासाठी लावतो तर कोणी येऊन अपकृत्य करू नये यासाठीच ना? की कुलूप लावतच नाही अस सर्वसामान्यपणे कोणी करत का? नाही ना, तितक्या स्वाभाविकपणेच संघ विजयादशमीच्या उत्सवाला शस्त्रपूजन करणारच आहे. हिंदू परंपरेनूसारच घराघरांमध्ये विशिष्ठ वस्तूंचे पूजन केले जाते, तशाच पद्धतीने संघाच्या उत्सवांमध्ये शस्त्रपूजन केले जाणार आहे. प्रकाश आंबडेकरांना जर यासंदर्भात प्रश्न पडलेले असतील तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यावर आम्ही का भाष्य करावे? असेही ते म्हणाले.
भाजपाचे राज्य असून कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचीही जबाबदारी त्याचपक्षाकडे असून गृहखातेही त्यांच्याकडेच आहे, पण असे असतानाही संघ शस्त्रपूजन करणार का? यावर बापट म्हणाले की, संघाच्या विजयादशमीच्या उत्सवात केले जाणारे शस्त्रपूजन आणि राज्य कोणत्या पक्षाचे आहे, नाही याचा काहीही संबंध नाही. हिंदू परंपरेनूसार जे उपक्रम आहेत ते होणारच असेही ते म्हणाले. डोंबिवलीतही रविवारी विविध ठिकाणी नगरश: होणाऱ्या संघाच्या उत्सवांमध्ये शस्त्रपूजन होणारच असल्याचे संघाच्या येथील पदाधिकाऱ्यांनीही सांगितले.