ठाणे : आरटीई प्रवेशाला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, ९,०८८ पैकी ६,१०१ बालकांचा प्रवेश निश्चित झालेला आहे. उर्वरित बालकांनी शाळेत जाऊन ३१ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये. सर्व नियमांचे पालन करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संतोष भोसले यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपातील २५ टक्के आरटीई प्रवेशासाठी ७ एप्रिल रोजी लॉटरीची प्रक्रिया राज्य स्तरावरून पूर्ण करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये जिल्ह्यातील एकूण ९,०८८ अर्जांची निवड झाली आहे. निवड झालेल्या बालकांच्या पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाईल, परंतु पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा, तसेच प्रवेश घेण्यासाठी बालकांना सोबत नेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.