डोंबिवली - इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या रिक्षा चालकांना आरटीओकडे वेळोवेळी दरवाढ मागूनही वाढ मिळत नसल्याने स्वत:हूनच दोन रूपयांची दरवाढ करण्याचा निर्णय डोंबिवलीमध्ये आदर्श रिक्षा चालक मालक संघटना, तसेच अन्य संघटनेने घेतला होता. त्या परस्पर निर्णयाची कल्याण आरटीओ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत बुधवारी नोटीस बजावल्या आणि गुरुवारी पहाटेच रामनगर रिक्षा स्टँडजवळ धडक कारवाई केली.
आरटीओचे सकाळपासूनच पथक शहरात आल्याने भाडेवाढ घ्यायची की नाही या संभ्रमात रिक्षा चालक होते. त्यावर जादाचे भाडे घेतले तर दंडात्मक कारवाई होणारच असे आरटीओ मोटार वाहन निरिक्षक राजेश परदेशी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काही काळ रिक्षा चालकांचीही भंबेरी उडाली होती. प्रवाशांनीही जादाचे भाडे न देण्याचे सांगत रिक्षा चालकांनाही नियमाप्रमाणेच वागण्याचे आदेश आरटीओ अधिकाऱ्यांनी दिले. तसेच आदर्श रिक्षा चालक मालक संघटनेने जे दरवाढीचे फलक लावले होते ते तातडीने काढण्यास सांगितले. त्यानूसार काढलेले फलक रामनगर पोलिसांकडे जमा करण्यात आले. त्यापुढेही जर नियमांचे उल्लंघन करून भाडेवाढ आकारण्यात आली तर मात्र कठोर कारवाईचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिले होते. त्यामुळे शहरात सकाळपासूनच विविध रिक्षा स्टँडवर आरटीओची करडी नजर होती. प्रवाशांना कुठेही त्रास होऊ नये यासाठी आरटीओचे पथक पहाटेपासूनच दक्ष होते. त्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. या कारवाईला डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रक विभागाचे अधिकारी एम.एच.जाधव यांनीही पुढाकार घेत वाहतूकीवर परिणाम होऊ देऊ नका अशी तंबी रिक्षा चालकांना दिली होती.
दरम्यान लाल बावटा रिक्षा संघटनेचे संस्थापक काळू कोमास्कर, आणि आदर्श रिक्षा चालक मालक संघटनेला आरटीओ अधिकारी ससाणे यांनी बुधवारी नोटीस बजावत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संघटनांची राहील असे आदेशात केले होते. त्याची दखल घेत काही ठिकाणचे फलक संघटनांनी रातोरात काढले होते, रामनगर येथील फलक मात्र तसाच असल्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत तो काढण्यास सांगितला.
दरवाढीची त्यांची मागणी एमएमआरटीएकडे पाठवली. त्यावर दोन बैठका झाल्या असून निर्णय प्रतिक्षेत आहे. त्यामुळे असा मनमानी कारभार करून जनतेला कोणालाही वेठीस धरता येणार नाही. मागणी पुन्हा मांडायची असेल तर बैठकीसाठी यावे, चर्चा करावी असे आवाहन ससाणे यांनी केले होते. त्यानूसार संबंधित संघटनांच्या पदाधिका-यांना समज देण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी आरटीओ अधिकाऱ्यांनी बोलावल्याचेही सूत्रांनी सांगितले.