ठाणे : प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी, प्रवाशांशी हुज्जत घालणे, वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या ठाणे स्थानका बाहेरील मुजोर रिक्षा चालकांना ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने धडक मोहीम राबवली आहे. १ ते १७ एप्रिल या काळात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६५० रिक्षा चालकांवर या विभागाने कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल १० लाखांचा दंड वसूल केला आहे. बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लागेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे स्थानक परिसरातून रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. स्थानकात लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस मधून उतरणारे अनेक प्रवासी घोडबंदर रोड, मीरारोड भाईंदर, वसई या ठिकाणी रिक्षाने जाण्याला प्राधान्य देतात. मात्र अशा प्रवाश्यांना अव्वाच्या सव्वा भाडे घेऊन काही रिक्षा चालक प्रवाशांची लुटमार, वाहतूक नियमांची पायमल्ली असल्याची तक्रार ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे आल्या होत्या. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने कारवाई सुरू करत गेल्या सतरा दिवसात तब्बल ६५० रिक्षा चालकांवर कारवाई केली असल्याची माहिती सहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी रिक्षा स्टँड तयार करून दिले आहे. या ठिकाणी एकाच वेळी प्रवशांसाठी ६ ते ७ पदरी रांगेत रिक्षा उभ्या राहू शकतात; एवढी मोठी जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतू काही रिक्षा चालक मुजोरीने वागून प्रवाशांच्या जिविताशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी ठरवून दिलेल्या रांगेत उभे न राहता हे मुजोर रिक्षा चालक रेल्वे फ्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ च्या प्रवेश द्वारावर उभे राहून प्रवाशांची दिशाभूल करून गाडीत बसवतात आणि जास्त भाड्याची आकारणी करतात. रेल्वे स्टेशन परिसरातील सॅटीस पुलाखाली रस्त्यावर रिक्षा उभी करून प्रवाशांच्या जाण्या-येण्याला अडथळा निर्माण करतात. अनेकदा प्रवाशांसोबत हुज्जत घालून दादागिरी करणे, लायसन, रिक्षा परवाना नसणाऱ्या रिक्षा चालकांवर विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्या कडून १० लाखांचा दंड वसूल केला आहे.
नियम डावलून जर कोणी रिक्षा चालक वर्तन करताना आढळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. मेल एक्सप्रेसने ठाणे स्थानकात उतरून मीरारोड, भाईंदर,वसई आदी ठिकाणी रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मीटर नुसार भाडे आकारणी करावी. नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबन आणि लायसन्स निलंबनाची देखील कारवाई करण्यात येणार आहे.जयंत पाटील (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे)