ठाणे : ठाणे परिवहन (आरटीओ) विभागाच्या आॅनलाइनपद्धतीमुळे परवानावाटपामध्ये आता बऱ्याच प्रमाणात पारदर्शकता आणि सुसूत्रता दिसू लागली आहे. त्यातच परवान्यांसाठी अर्ज करणा-या ५० टक्के अर्जदार शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) देताना गटांगळ्या खाताना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत परवानावाटप होण्याचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच अवैधरीत्या वाटप होणा-या परवान्यांवर निर्बंध आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे आरटीओ विभागांतर्गत ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसई हे उपविभाग कार्यरत आहेत. या विभागांतर्गत वर्षभरात जवळपास ५० ते ५२ हजारांच्या आसपास विविध प्रकारांच्या वाहनांचे परवानेवाटप होत होते. मात्र, २०१६-१७ मध्ये आॅनलाइन पद्धत सुरू झाली. त्यामुळे परवान्यांसाठी अर्ज घेण्यापासून त्याची फीही आॅनलाइन पद्धतीने भरता येत आहे. त्यामुळे अर्जदारांना आता आरटीओ कार्यालयात इतर परवान्यांसाठी मारावे लागणारे हेलपाटेही मारणे बंद झाले आहे. तसेच दलालांना पैसे देऊन ही कामे क रून घ्यावी लागत होती, ते बंद झाले आहे. ठाणे परिवहन विभागाने २०१२ या सालातील १ जानेवारी ते ३१ डिसेंबरदरम्यान ५६ हजार तीन परवान्यांचे वाटप केले आहे. तर, २०१३ मध्ये ५२ हजार १३६, २०१४ या वर्षात ४८ हजार ६३९, २०१५ सालात ५२,०७१ तसेच २०१६ या वर्षभरात ५८ हजार ४५६ परवान्यांचे वाटप झाले आहे. मात्र, आॅनलाइन पद्धत सुरू झाल्यापासून हे प्रमाण घटण्यास सुरुवात झाली आहे. २०१७ या वर्षभरात अवघे ४१ हजार २८५ परवान्यांचे वाटप झाले आहे. यावेळी परवान्यांसाठी जवळपास ८८ हजार २१२ जणांनी अर्ज केले होते. तर, या चालू वर्षात ७२ हजार १७६ जणांनी परवान्यांसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी अवघ्या ३० हजार २२७ जणांना परवान्यांचे आतापर्यंत वाटप झाले आहे.आॅनलाईन पद्धतीमध्ये परवानावाटपाचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांनी घटले, हे खरे आहे. मात्र आॅनलाईन पद्धतीमुळे एक मोठा फायदा झाला. तो म्हणजे अवैधरीत्या होणारे परवानेवाटप यामुळे पूर्णपणे बंद झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.
आॅनलाइनमुळे आरटीओ परवान्यांचे वाटप झाले ५० टक्क्यांनी कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 2:21 AM