लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बुधवारी चालत्या रिक्षामध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने शुक्रवारी अचानक या मार्गावरुन बेकायदेशीरपणे फिरणाऱ्या ७२ रिक्षांवर जप्तीची कारवाई केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे रिक्षा चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, एन. सी. नाईक, निरीक्षक शाम कमोद, श्रीकांत महाजन, दिलीप जऱ्हाडे, डॉ. विजय शेळके आदींच्या चार पथकांनी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास तीन हात नाका आणि बाळकूम नाका येथे अचानक रिक्षांची तपासणी केली. धक्कादायक म्हणजे अनेक रिक्षांवर १८ पेक्षा कमी वयाची मुलेही भन्नाट वेगाने रिक्षा चालवित असल्याचे आढळले. ३० रिक्षांमध्ये चक्क फ्रंट सीट (चालका शेजारी) प्रवासी बसवून बिनधास्तपणे रिक्षा हाकण्यात येत होत्या. तर अनेक चालकांकडे बॅज आणि चालविण्याचे लायसन्सही नव्हते. चालकांकडे खाकी तर रिक्षा मालकाचा पांढरा शर्ट असणे आवश्यक आहे. या नियमांनाही हारताळ फासण्यात आला होता. भिवंडीतून बाळकूमकडे येणाऱ्या अशा अनेक रिक्षा चालकांकडे बॅज किंवा चालविण्याची अनुज्ञप्ती (लायसन्स) नव्हती. सायंकाळी ६.३० ते ९ वा. पर्यत अशा ७२ रिक्षांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात आली. यात बाळकूम येथून २५ तर तीन हात नाका येथून ४० रिक्षांवर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘‘कारवाई केलेल्यांमध्ये अनेकांकडे परवाना किंवा इतरही कागदपत्रे नव्हती. बाळकूम भागात हे प्रमाण अधिक आढळले. ही कारवाई आता अधिक तीव्र केली जाणार आहे. अनधिकृत रिक्षा आणि जादा प्रवासी घेणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.’’शाम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ७२ रिक्षांवर आरटीओची कारवाई
By admin | Published: June 10, 2017 12:13 AM