ठाणे : सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून विनापरवाना मुंबई, ठाण्यातून परराज्यांत तसेच नेपाळकडे जाणाऱ्या एका बसला ४४ प्रवाशांसह ठाणे प्रादेशिक परिवहनच्या भरारी पथकाने रविवारी पडघा येथे पकडले. याशिवाय, गेल्या तीन दिवसांत आरटीओने ठाण्यातून परराज्यात जाणारी आणि येणारी अशी ३५ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून परप्रांतीय प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे मोटार वाहन निरीक्षक उमेश देवरे, सपना जमदाडे आणि विजय शिंदे आदींच्या पथकाने पडघा टोलनाका, घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेल चेक पोस्ट आणि पालघर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दापचरी चेक पोस्ट आदी ठिकाणी १९ ते २१ जून या तीन दिवसांमध्ये ही कारवाई केली. कारवाई केलेल्या बसमधील प्रवाशांना ३० दिवसांसाठी क्वारंटाइन केले आहे.
३५ बसवर आरटीओने केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 1:20 AM