उल्हासनगर - महापालिका अतिक्रमण विभाग, आरटीओ व वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून शहाड रेल्वे पुलाखालील अनधिकृत रिक्षांवर कारवाई सुरू करण्यात आली. याकारवाईने अवैध रिक्षाचालकांचे धाबे दणाणले असून कालबाह्य झालेल्या रिक्षावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगरातील विविध चौकात, रेल्वे स्टेशन परिसरात कालबाह्य झालेल्या रिक्षा, चोरीच्या रिक्षाची रेलचेल असल्याची चर्चा रंगली होती. अशा रिक्षावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने आक्रमक भूमिका घेऊन आरटीओ, शहर वाहतूक यांना कारवाईसाठी पत्र लिहिले होते. यातूनच मंगळवारी शहाड रेल्वे स्टेशन परिसरातील पुलाखाली अनेक रिक्षावर आरटीओ, महापालिका, शहर वाहतूक यांनी संयुक्त कारवाई केली. अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
महापालिकेत दोन महिन्यापूर्वी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शहरातील वाहतुकीच्या समस्येवर चर्चा झाली होती. त्यानुसार टप्प्याटप्प्याने अवैध व कालबाह्य रिक्षावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली आहे. यापूर्वी बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. कारवाईत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी तुषार सोनवणे, गणेश शिंपी, अजित गोवारी, व दत्तात्रेय जाधव आणि आरटीओ इन्स्पेक्टर अमित नलावडे व वाहतूक पोलीस अधिकारी सहभागी झाले आहेत.