लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : दोन आठवड्यांत केडीएमसी क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आता तर रोज ४००पेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत असल्यामुळे कल्याण-डोंबिवली ही शहरे पुन्हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट म्हणून प्रकाशात आली आहेत. पण, त्यावर नियंत्रण आणणे, ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून, सर्वच शासकीय यंत्रणा, नागरिकांची आहे. त्यातही प्रामुख्याने आरटीओ, वाहतूक पोलीस यांची आहे. कल्याण-डोंबिवलीत आरटीओ अधिकारी कित्येक वर्षांत बघितले नाही, हे अधिकारी आहेत तरी कुठे? असा सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ, तेजस्विनी महिला संघटनेने केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केडीएमसी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी निर्बंध लागू केले आहेत. परंतु, प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी फक्त मनपा प्रशासनाची आहे, असे शासन आदेश आहेत का? कारण कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील राज्य शासनाचे इतर प्रशासन व लोकप्रतिनिधी यासाठी प्रयत्न करताना कुठेही दिसत नाहीत. लोढा पलावा, काटईनाका या भागातून येणाऱ्या रिक्षा सर्वांसमक्ष नियम डावलून चार प्रवासी घेऊन डोंबिवलीत येत आहेत. वर रिक्षा भाडेवाढ करून म्हणजे उघडपणे लूटमार करीत आहेत. परंतु, आरटीओ डोळे मिटून कुठे बसले आहेत. रस्त्यावर प्रत्यक्ष उभे असणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना उघडपणे लोकांच्या जीवनाशी खेळणारे हे नियम तोडणारे रिक्षाचालक दिसत नाहीत काय, असा प्रश्न करून इथेही कमावण्याचे नवीन मार्ग मिळाले म्हणून डोळे मिटून दूध पिणारे मांजर झाले आहेत, असा आरोप तेजस्विनी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केला आहे. यासाठी महासंघातर्फे संबंधित मंत्री व वरिष्ठ प्रशासन यांना योग्य मार्गाने तक्रार, निवेदन देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
-------