मीरारोड - मीरा भाईंदर भाजपातील नगरसेवकांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधात दंड थोपटल्याने आज भाजपाचे प्रदेश सरचटणीस रवींद्र चव्हाण यांनी नगरसेवकांची बैठक बोलावली होती . परंतु या बैठकीला मेहता विरोधक विरुद्ध मेहता समर्थक असे स्वरूप येऊन दोन्ही बाजूच्या नगरसेवकां मध्ये राडेबाजी झाली. नगरसेवकांनी शिविगाळ, धक्काबुक्की, आरडाओरडा आणि गोंधळ घातला.
मीरा भाईंदर भाजपात माजी वादग्रस्त आमदार नरेंद्र मेहतां विरोधात खदखदत असलेला आक्रोश बाहेर पडू लागला आहे . महापौर निवडणुकीत भाजपा नगरसेवकांनी ज्योत्सना हसनाळे यांची बाजू घेत मेहता समर्थक रुपाली मोदी यांना बाजूला केले . उपमहापौर पदासाठी देखील मेहता समर्थक ध्रुवकिशोर पाटील यांना कडाडून विरोध केला गेला .
तर भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर करणारे मेहता दुसरीकडे पालिकेत महापौर दालनात मात्र सतत बसू लागले . त्यांच्या हस्तक्षेप सह त्यांच्या मुळे सतत होत असलेली पक्षाची बदनामी आदी कारणांनी भाजपातील अनेक प्रमुख नगरसेवकांनी मेहता हटाव आणि शहर व भाजपा बचाव अशी भूमिका घेतली आहे .
त्यातच नगरसेविका वैशाली रकवी यांचा स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा घेणे , परस्पर स्वतःच्या सी एन रॉक हॉटेलात नगरसेवकांची आढावा बैठक लावणे या वरून अनेक नगरसेवकांनी संताप व्यक्त केला . काही प्रमुख नगरसेवकांनी या बाबत बैठक घेतली . दुसरीकडे सोमवारी जिल्हाध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीला जाऊ नका असे फोन नगरसेवकांना स्वतः मेहता आणि समर्थक नगरसेवकांनी केले. या मुळे देखील भाजपातील मेहता विरोधकांत रोष निर्माण झाला .
सदर प्रकार भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांना कळल्या नंतर त्यांनी आज मंगळवारी भाईंदरच्या माहेश्वरी भवन येथे नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली होती . सदर बैठकीला जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे , महापौर ज्योत्सना हसनाळे , नरेंद्र मेहता आदी व्यासपीठावर होते . तर खाली सर्व नगरसेवक बसले होते .
यावेळी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने बैठक बोलावली असताना देखील नरेंद्र मेहता व समर्थक नगरसेवकांनी फोन करून बैठकीला जाऊ नका असे सांगितल्याच्या मुद्द्या वरून खडाजंगी सुरु झाली . मेहता समर्थक नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील व विरोधक दौलत गजरे यांच्यात जुंपली .
मेहतां विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करणाऱ्या नगरसेविका नीला सोन्स यांच्या बद्दल आक्षेपार्ह्य शब्द मेहता समर्थक नगरसेविकेने वापरल्या वरून वाद झाला आणि मेहता समर्थक नगरसेविका नीला यांच्या अंगावर तावातावाने धावून गेल्या . त्यावेळी दीपाली मोकाशी , मुन्ना सिंह आदी नगरसेवक मध्ये पडल्या मुळे अनर्थ टळला . बैठकीत शिवीगाळ , धक्काबुक्की व आरडाओरडा झाला .
अखेर रवींद्र चव्हाण हे बैठक अनिर्णित ठेऊनच निघून गेले . चव्हाण यांना मात्र सातत्याने संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही . तर बैठक आटोपल्यावर खाली आलेल्या काही नगरसेवकांनी मेहतांवर निशाणा साधत भाजपा हा पक्ष असून कोण्या एका व्यक्तीची खाजगी कंपनी नाही . या पुढे कोणाची मनमानी आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही असे काही नगरसेवकांनी बोलून दाखवले . तर सदर बैठकीस मी रवींद्र चव्हाण यांना भेटण्यास आलो होतो असे नरेंद्र मेहता म्हणाले.