कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची दोन रुग्णालये आहेत. मात्र, शवविच्छेदनाची सुविधा केवळ रुक्मिणीबाई रुग्णालयातच आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात ही सुविधा सुरू करण्याचा विषय अद्याप कागदावरच राहिल्याने रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांवर ताण वाढला आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात या वर्षभरात १२७० जणांचे शवविच्छेदन करण्यात आलेले आहे. डॉक्टरांकडून करण्यात येणाऱ्या मागणीचा प्रशासनाकडून गांभीर्याने विचार केला जात नाही.
रुक्मिणीबाई रुग्णालयात आधीपासून शवविच्छेदनाची सुविधा आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ दरम्यान १२७० शवविच्छेदन करण्यात आलेले आहे. त्यासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांना जास्तीचे काम करावे लागते. कॅज्युअलिटी, ओपीडी आदी कामे करून रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांना शवविच्छेदनाचे काम करावे लागते. महापालिकेचे डोंबिवली येथे शास्त्रीनगर रुग्णालय आहे. तेथेही शवविच्छेदनाची सुविधा केली जावी, अशी मागणी आहे.
डोंबिवलीतून कल्याणमध्ये एखादा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यासाठी सहा किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. आता तर डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा दुरुस्तीसाठी बंद ठेवला आहे. तसेच, कल्याणच्या पत्रीपुलाचे काम सुरू आहे. हा पूल मार्च २०२० अखेर पूर्णत्वास येण्याचा दावा केला जात असला तरी तोपर्यंत मृतदेहाला पत्रीपुलावरील वाहतूककोंडीचा सामना करत कल्याणचे रुक्मिणीबाई रुग्णालय गाठावे लागते. मृतदेह नेताना नातेवाइकांची परवड होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदनाचे काम करण्यासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांना १२ -१२ तास ड्युटी करावी लागते. रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांची पदे समकक्ष आहे. तसेच त्यांना वेतनही समान दिले जाते. तरीही शवविच्छेदनाचा ताण रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांना सहन करावा लागत आहे.रुक्मिणीबाई रुग्णालयावर ताण जास्त असून, कर्जत, टिटवाळा, डोंबिवली व ग्रामीण भागातून मृतदेह शवविच्छेदनासाठी या रुग्णालयात येतात. याशिवाय मेडिकल आणि कायदेशीर प्रकरणे जास्त प्रमाणात येतात. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना शवविच्छेदनाची ड्युटी लावली जाते. मात्र, ते शवविच्छेदनाच्या कामासाठी येत नाहीत. त्यांच्याविरोधात आरोग्य विभाग कोणतीच कारवाई करत नाही. शवविच्छेदनासाठी नातेवाइकांची घाई असते, मात्र डॉक्टरावर ताण असल्याने अनेकदा उशीर होतो, याकडेही रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांनी लक्ष वेधले.महापालिकेतील सदस्यांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी सुविधा सुरू केली जावी, हा विषय डॉ. स्मिता रोडे या वैद्यकीय अधिकारी होत्या तेव्हापासून सुरू आहे. त्या सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी वैद्यकीय अधिकारी राजू लवंगारे आले. तरीही हा विषय मार्गी लागलेला नाही. याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनाही प्रशासनाकडून दाद दिली जात नसल्याबात नाराजी व्यक्त होत आहे.रुग्णालयातील निम्मी पदे रिक्तमहापालिका रुग्णालयात ११९ पदे वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचारी वर्गाची पदे आहेत. त्यापैकी निम्मी पदे भरलेली आहेत. उर्वरित पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया २०१४ पासून सुरू आहे. मात्र, त्याची पूर्तता होत नाही. त्यात अनेक प्रशासकीय अडचणी येतात. हा विषय मार्गी लावण्यासाठी महापालिकेने मानधनावर डॉक्टर सेवेत घेऊन पदे भरण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी असा उपाय भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयुक्तांना सुचवला होता.