उल्हासनगर - उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपमधील 11 पेक्षा अधिक नगरसेवकांचा गट फुटून बाहेर पडल्याने आणि तो सभागृहात शिवसेना सदस्यांच्या शेजारी बसल्याने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. शिवसेना- भाजपमध्ये घोषणाबाजी, बाचाबाची, नगरसेवक पळवापळवीचे आरोप, आपापल्या नगरसेवकांना खेचून नेण्याचे प्रकार सुरू असल्याने महापौरपदाची निवडणूक खोळंबली आहे. एक तृतीयांशपेक्षा अधिक सदस्य फुटल्याने या पालिकेतील भाजपची सत्ता जवळपास गेल्यात जमा आहे. ज्या ओमी कलानी यांच्या मदतीमुळे उल्हासनगर महापालिकेत भाजपची सत्ता आली, त्यांना सत्तेचा वाटा देण्यापासून भाजपच्या एका सतत रोखले, कोंडी केली आणि आमदाकरीच्या निवडणुकीवेळी ज्योती कलानी यांना राष्ट्रवादी सोडायला लावून नंतर भाजपतर्फेही उमेदवारी दिली नाही. त्यानंतर उल्हासनगरच्या राजकारणातून कलानी कुटुंब संपवल्याची भाषा केली. त्याचा परिणाम आजच्या घडामोडींवर दिसून आला. भाजपाने या संधीचा फायदा उठवला. उल्हासनगर पालिकेत महापौरपदासाठी ४० सदस्यांची आवश्यकता आहे. सध्या शिवसेनेकडे त्यांचे २५, राष्ट्रवादीचे ४, रिपाइंचे ३, काँग्रेस, भारिप, पीआरपीचे प्रत्येकी एक असे ३५ सदस्य आहेत. त्यात भाजपाचा फुटीर गट समाविष्ट झाल्याने ही संख्या ४६ पेक्षा अधिक झाली आहे. भाजपकडे स्वतःचे ३१, घाईघाईने विलीन करून घेतलेले साई पक्षाचे १० आणि विलीन न होता वेगळे राहिलेले साई पक्षाचेच दोन असे ४३ चे संख्याबळ होते. पण त्यातील किमान ११ पेक्षा अधिक नगरसेवक फुटल्याने त्यांची संख्या घटून ३२ पर्यंत खाली आली आहे. परिणामी शिवसेनेच्या लीलाबाई आशान या महापौर होण्याची दाट शक्यता आहे.
उल्हासनगरमध्ये सत्तारूढ भाजपा फुटली; शिवसेनेचा कमळाला 'धोबीपछाड'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 1:02 PM