भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने सत्ताधारी भाजपाने थेट नागरीकांच्या माथी करवाढीसह नवीन कर लागू करण्याचा अन्यायकारक कारभार सुरु केला आहे. भाजपा बहुमताच्या जोरावर करीत असलेला हा कारभार आक्षेपार्ह असुन होणारी करवाढ मागे न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडू, असा इशारा मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस अध्यक्ष अनिल सावंत यांनी दिला आहे.
सत्ताधारी भाजपा जनतेचा विश्वासघात करीत असल्याचा आरोप सावंत यांनी केला असुन यापुर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्ताधाऱ्यांनी अशी भरमसाठ कधीही केली नव्हती, असा दावा केला आहे. तत्कालिन स्थायी समितीच्या बैठकांत मालमत्ता करवाढीसह पाणीपट्टीत वाढ करण्यास सत्ताधारी भाजपाने बहुमताने मान्यता दिली आहे. या करवाढीखेरीज नवीन मलप्रवाह कर, घनकचरा शुल्क, पाणीपुरवठा लाभ कर लागू करण्यासही मान्यता दिली असुन यामुळे नागरीकांना वर्षाकाठी अडीच ते दोन हजारांची अन्यायकारक करवाढ सहन करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजपाने एकहाती सत्ता येताच नागरीकांच्या माथी कराचे ओझे टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजपा सत्ताधारी नागरीकांना अच्छे दिनाऐवजी बुरे दिनातच ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकातील आकडे देखील भाजपाच्याच सत्ताकाळात वाढविण्यात आले असुन त्यात देण्यात आलेल्या उत्पन्नाच्या वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पालिकेकडे विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. घनकचरा प्रकल्प अद्याप सुरु झाला नसतानाही अन्यायकारक घनकचरा शुल्क लागू करण्यास स्थायीने मान्यता दिली आहे. ७५ एमएलडी पाणीपुरवठा योजना अद्याप पुर्णपणे कार्यान्वित न होता पालिकेकडुन सध्या केवळ ५० एमएलडी पाणीपुरवठाच नागरीकांना केला जात आहे. उर्वरीत २५ एमएलडी पाणीपुरवठ्याचा अद्याप पत्ता नाही. असे असतानाही भाजपाने पाणीपुरवठा लाभ कर लागू करण्यास मान्यता दिली आहे. हि करवाढ अयोग्य असल्याचे मत सावंत यांनी व्यक्त करुन भाजपाने आपल्या कार्यकाळात कोणतेही लोकाभिमुख कामे न करता त्यात आलेले अपयश झाकण्यासाठीच दरवाढीचा उपद्व्याप सुरु केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपाने शहरात विविध विकासकामांसाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध झाल्याची जाहिरातबाजी केली होती. तो निधी गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित करुन भाजपाने नागरीकांची केलेली दिशभूल त्वरीत थांबवावी, अशी मागणी त्यांनी यांनी केली आहे. येत्या २० फेब्रुवारीला महासभेऐवजी भाजपाने विशेष महासभा आयोजित केली आहे. हा प्रशासनाचा नव्हे तर भाजपाचा एकतर्फी कारभार सुरु आहे. त्या महाभसेत करवाढीला मान्यता दिल्यास जनक्षोभ उसळून काँग्रेस तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.